मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  ED Raid Pimpri : पिंपरीत ईडीचे छापे; ४०० कोटींच्या कर्ज घोटाळ्यात बँकेच्या माजी अध्यक्षाची झाडाझडती

ED Raid Pimpri : पिंपरीत ईडीचे छापे; ४०० कोटींच्या कर्ज घोटाळ्यात बँकेच्या माजी अध्यक्षाची झाडाझडती

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jan 27, 2023 04:22 PM IST

ED Raid on Amar Mulchandani in Pimpri : ईडीचं छापासत्र राज्यात सुरूच असून आज पिंपरीतील सेवा विकास बँकेतील घोटाळा प्रकरणातील आरोपींवर छापे टाकण्यात आले.

ED Raids in Pimpri
ED Raids in Pimpri (HT_PRINT)

ED Raid Pimpri : राज्यात सक्तवसुली संचानलयाचं (ED) छापासत्र सुरूच आहे. ईडीच्या पथकानं आज पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड येथील सेवा विकास बँकेचे माजी अध्यक्ष अमर मूलचंदानी यांच्या घरी छापा टाकला. मूलचंदानी यांचं घर, कार्यालय व अन्य काही ठिकाणी ईडीच्या अधिकाऱ्यांकडून झाडाझडती सुरू आहे.

बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज वाटप केल्याचा आरोप मूलचंदानी यांच्यावर आहे. याच आरोपांच्या आधारे ही कारवाई करण्यात आल्याचं समजतं. सेवा विकास सहकारी बँकेच्या संचालकांनी कर्जाचे एकूण १२४ बनावट प्रस्ताव मंजूर केले होते. या माध्यमातून तब्बल ४०० कोटींहून अधिक रुपयांचं कर्ज विविध संस्था व प्रभावी व्यक्तींना देण्यात आलं होतं. हे संपूर्ण कर्जवितरण नियमबाह्य पद्धतीनं करण्यात आलं होतं. कर्ज मिळण्याची व परतफेडीची पात्रता नसतानाही अनेकांवर मेहेरबानी करण्यात आली होती.

बोगस कर्जवाटपामुळं बँकेचं मोठं नुकसान झालं आहे. हे प्रकरण चव्हाट्यावर आल्यानंतर २०२० मध्ये सहकार सहआयुक्त राजेश जाधव यांनी बँकेच्या कर्ज वाटपाचं ऑडिट केलं होतं. या ऑडिटमधून गैरव्यवहार उघडकीस आला. या प्रकरणी गुन्हा दाखल होऊन पिंपरी पोलिसांनी अमर मूलचंद यांच्यासह पाच जणांना अटक केली होती.

काही महिन्यांपूर्वी अमर मूलचंदांनी यांची जामिनावर सुटका झाली होती. त्यानंतर आज ईडीनं आज कारवाई केली. सध्या सेवा विकास सहकारी बँकेवर आरबीआयनं प्रशासकाची नियुक्ती केली आहे. कर्जवाटपातील गैरव्यवहारामुळं हजारो ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये बँकेत अडकून आहेत.

IPL_Entry_Point