ED Notice To Amol Kirtikar: शिवसेना उद्धव ठाकरे गटाने वायव्य मुंबईतून अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, त्यांच्या नावाची घोषणा करताच काही वेळेतच ईडीने त्यांना नोटिस धाडली असून एक पथक त्यांच्या बंगल्यावर पोहचले आहे. या पथकाने त्यांच्या दापोली येथील बंगल्याची झाडझाडती सुरू केली आहे. यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. तर अमोल कीर्तिकर यांच्या अडचणीत आता वाढ होणार आहे.
देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. भाजपने आपली उमेदवारी यादी जाहीर केली आहे. राज्यात देखील महाविकास आघाडी तर्फे उमेदवारी जाहीर करण्यात येत आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाने देखील त्यांच्या १७ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मुंबईतून चौघांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. वायव्य मुंबईतून अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी दिली गेली आहे. कीर्तिकर यांना उमेदवारी जाहीर करताच एका तासात ईडीने अमोल कीर्तिकर यांना ईडीने नोटीस बजावली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांचे एक पथक अमोल कीर्तिकर यांच्या बंगल्यावर सकाळीच पोहोचले असून त्यांच्या बंगल्याची झडती घेतली जात आहे.
ईडीचे पथक कीर्तिकर यांच्या दापोलीतील शिर्दे येथील त्याच्या बंगल्यावर पोहचले आहे. ईडीचे अधिकारी त्यांच्या बंगल्यावर पोहचताच त्यांनी तपास सुरू केला आहे. बंगल्यातील अनेक फायली ईडीच्या पथकाने ताब्यात घेतल्या असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
कीर्तिकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यावर करण्यात आलेल्या ईडीच्या कारवाईवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. यावरून ईडीच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी अमोल कीर्तिकर यांना कार्यालयात दिवसभरात हजर राहण्याची नोटिस दिली आहे.
अमोल कीर्तिकर हे गजानन कीर्तिकर यांचे चिरंजीव आहेत. काही दिवसांपूर्वी गजानन कीर्तिकर यांनी ठाकरे यांना जय महाराष्ट्र करत शिंदे गटात प्रवेश केला होता. मात्र, अमोल कीर्तिकर हे उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास दाखवत मूळ शिवसेनेतच राहिले. ठाकरे हे कीर्तिकर यांना उमेदवारी देणार याची चर्चा होती. तशी घोषणा आज करण्यात आली. मात्र, उमेदवारी जाहीर होताच त्यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागला आहे.