State Co Operative Bank Scam : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री जयंत पाटील यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण जयंत पाटील यांचे भाचे आणि आमदार प्राजक्त तनपुरे यांचं नाव राज्य सहकारी बँक घोटाळ्याच्या आरोपपत्रात दाखल करण्यात आलं आहे. ईडीकडून १४ नावांचा आरोपपत्रात समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये मातब्बर नेत्यांच्या नावाचा समावेश आहे. त्यामुळं आता यावरून नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर ईडीकडून घोटाळ्याचे आरोप करण्यात आले होते.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणाची ईडीकडून चौकशी सुरू आहे. त्यामध्ये ईडीने आणखी १४ लोकांवर आरोपपत्र दाखल केलं आहे. त्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचे भाचे प्राजक्त तनपुरे, प्रसाद सागर, कॉंग्रेस नेते रणजीत देशमुख, सुभाष देशमुख, अरविंद खोतकर यांच्यासह शिंदे गटाच्या एका नेत्याचं नाव असल्याची माहिती आहे. परंतु या प्रकरणातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नाव वगळण्यात आल्याचं बोललं जात आहे. अजित पवार यांच्या नावावर ईडीच्या अधिकाऱ्यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात आणखी १४ लोकांची चौकशी केली जाणार असल्याची माहिती आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून राज्यातील साखर कारखाने आणि सूत गिरण्यांना कोट्यवधी रुपयांच्या कर्जाचं वाटप करण्यात आलं होतं. परंतु या कोट्यवधींच्या कर्जाची परतफेडच झाली नाही. परिणामी सहकारी बँका दिवाळखोरीच्या कचाट्यात सापडल्या. त्यानंतर या प्रकरणात २५ हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत ईडीने चौकशी सुरू केली होती. नाबार्ड आणि मुंबई पोलिसांचा अहवाल पाहत हायकोर्टानेही या प्रकरणावरून ताशेरे ओढले होते. त्यानंतर आता ईडीने आणखी १४ नेत्यांची नावं आरोपपत्रात समाविष्ट केल्यानं यावरून नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.