ED Raid on Mangaldas Bandal : पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती आणि अजित पवार यांचे निकटवर्तीय मंगलदास बांदल यांना ईडीने मोठा धक्का दिला आहे. बांदल यांच्या पुण्यातील व शिरूर तालुक्यातील घरावर मंगळवारी ईडीच्या पथकाने धाड टाकली होती. बांदल यांची तब्बल १६ तास चौकशी केल्यावर ईडीच्या पथकाच्या हाती मोठं घबाड हाती लागलं आहे. मंगळवारी रात्री त्यांना ईडीने अटक करत मुंबईला नेलं आहे.
पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या फसवणूक प्रकरणी बांदल यांना २६ मे २०२१ रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर लोकसभा निवडणुकीपूर्वी काही दिवस अगोदर त्यांना जमीन मंजूर करण्यात आला हतो. दरम्यानच्या काळात त्यांच्या विरोधात अनेक तक्रारी आल्या होत्या. यापूर्वी आयकर विभागाने त्यांच्यावर कारवाई केली होती.
मंगळवारी ईडीच्या पथकाने मंगलदास बांदल यांच्या पुण्यातील महम्मदवाडी, शिक्रापूर आणि बुरुंजवाडी (ता.शिरूर) येथील निवासस्थानांवर सकाळपासून छापेमारी करण्यास सुरुवात केली होती. या कारवाईत तब्बल ५ कोटी ६० लाख रुपयांची बेहिशेबी रक्कम पोलिसांना आढळून आली होती. यावेळी बांदल यांच्या पत्नी व जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या रेखा बांदल व भाऊ हे शिक्रापूर येथील निवासस्थानी होते. तर महमंदवाडी येथील निवासस्थानी मंगलदास बांदल व पुतणे होते. मंगळवारी रात्री ११.३० वाजेपर्यंत ईडीची कारवाई सुरु होती. तब्बल १६ ते १७ तासांच्या चौकशीनंतर बांदल यांना ईडीने रात्री अटक करून मुंबईला नेले आहे. ईडीच्या कारवाईमुळे मंगलदास बांदल यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
मंगलदास बांदल ही अजित पवार यांचे जवळचे सहकारी आहेत. ते पैलवान म्हणून पुणे जिल्ह्यात परिचित आहेत. मंगलदास बांदल हे पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व बांधकाम सभापती आहेत. २०२० मध्ये ५० कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणानंतर त्यांना निलंबित करण्यात आलं होतं. बांदल यांच्या घरातून पाच आलिशान गाड्या आणि एक कोटी किमतीचे ४ मनगटी घड्याळे देखील सापडले आहेत. मंदलदास बांदल यांची ईडीने ४ वेळा चौकशी केली आहे. मंगळवारी त्यांच्या घरावर पहिल्यांदात छापा टाकण्यात आला. मनी लॉन्ड्रींग प्रकरणात यापूर्वी बांदल यांना ईडीने नोटिसा देखील बजावल्या आहेत.