मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  अर्जुन खोतकरांवर ईडीची मोठी कारवाई, साखर कारखान्याची जमीन, यंत्रसामुग्री जप्त

अर्जुन खोतकरांवर ईडीची मोठी कारवाई, साखर कारखान्याची जमीन, यंत्रसामुग्री जप्त

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jun 24, 2022 06:07 PM IST

ईडीने अर्जुन खोतकर यांचा जालन्यातील सहकारी साखर कारखान्याची२००एकर जागा,कारखान्याची इमारत आणि कारखान्यात असलेली यंत्रसामग्री जप्त केली आहे.

अर्जुन खोतकरांवर ईडीची मोठी कारवाई
अर्जुन खोतकरांवर ईडीची मोठी कारवाई

जालना -  राज्यात राजकीय अस्थिरता माजली असताना तसेच शिवसेनेत उभी फूट पडली असताना अजूनही शिवसेनेला धक्के बसत आहेत. शिवसेनेचे नेते व माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्यावर ईडीने आज कारवाई केली आहे. ईडीने काही महिन्यांपूर्वी अर्जुन खोतकर यांच्या कारखान्यावर तसेच अन्य मालमत्तांवर छापा टाकला होता. त्यानंतर आता ईडीने खूप मोठी कारवाई केली आहे. ईडीने खोतकर यांचा जालन्यातील सहकारी साखर कारखान्याची २०० एकर जागा, कारखान्याची इमारत आणि कारखान्यात असलेली यंत्रसामग्री जप्त केली आहे. 

खोतकरांवरील ही कारवाई शिवसेनेसाठी खूप मोठा धक्का आहे. कारखान्याच्या जमिनीचा जो व्यवहार झाला आहे, त्यामध्ये अनियमितता आढळल्याचा आरोप आहे. याच आरोपांप्रकरणी संबंधित कारवाई करण्यात आली आहे.

राज्यात एकीकडे राजकीय भूकंप सुरू असताना दुसरीकडे शिवसेनेच्या आणखीन एका नेत्यावर ईडीने कारवाईचा बडगा उचलत खळबळ उडवून दिली. शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या जालना सहकारी साखर कारखान्यावर ED कडून  जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. कारखाना खरेदी व्यवहारात गैरप्रकार झाल्याचा ठपका ठेवून ही कारवाई करण्यात आली आहे.

काही महिन्यांपूर्वी ईडीने या साखर कारखान्यासह कृषी उत्पन्न बाजार समिती आणि अर्जुन खोतकर यांच्या दर्शना या निवासस्थानी दोन दिवस छापेमारी केली होती. दरम्यान, आता अचानक झालेल्या या जप्तीच्या कारवाईमुळे एकच  खळबळ माजली असून खोतकर सध्या मुंबईत आहेत. 

दरम्यान, या कारवाईमुळे खोतकर-दानवे वाद पुन्हा चिघळणार असून ईडी चा धाक दाखवून थेट भाजप अथवा बंडखोर एकनाथ शिंदे गटाकडे खेचण्याचा हा प्रयत्न असल्याची चर्चा सर्वत्र सुरू झाली असून खोतकर यांनी मात्र आपण घाबरणार नसल्याचे म्हटले आहे. 

काय आहे प्रकरण -

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जालन्यातील रामनगर साखर कारखाना खरेदी प्रकरणी शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्यावर १०० कोटी घोटाळ्याचा गंभीर आरोप केला आहे. सोमय्यांनी आरोप केल्यानंतर २६  नोव्हेंबर २०२१ रोजी ईडीचं एक पथक खोतकर यांच्या घरावर दाखल झालं होतं. त्यांनी रामनगर साखर कारखाना खरेदी प्रकरणी खोतकरांची कसून चौकशी केली होती. विशेष म्हणजे ईडीच्या अधिकाऱ्यांनी खोतकरांची सलग १२ तास चौकशी केली. पण १२  तासांच्या चौकशीनंतरही ईडीच्या अधिकाऱ्यांचे समाधान झाले नव्हते. त्यामुळे त्यांनी पुन्हा जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत छापा टाकत कागदपत्रांची पडताळणी केली होती.

खोतकरांनी रामनगर साखर कारखाना हा बेनामी खरेदी केल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. तसेच "अर्जुन खोतकर यांनी साखर कारखान्यात घोटाळा तर केलाच पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कृपेने याच कारखान्याशी संबंधित १० एकर शासकीय जागा गिळंकृत करण्याचा प्रयत्न केल्याचा तसेच खोतकरांना ही १०० एकर जागा बिल्डिंग, मॉल्स, कर्मिशिअल कॉम्पलेक्स करण्यासाठी हवी आहे. ही जमीन साखर कारखान्यासाठी देण्यात आली होती. त्या जागेची किंमत ४०० कोटी आहे. शासकीय जमीन मिळून संपूर्ण जागा ही जवळपास २४० एकर आहे. त्याची एकूण किंमत १ हजार कोटी इतकी आहे, असा आरोप सोमय्या यांनी केला आहे.

WhatsApp channel