NCP Symbol and Name: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला दिले. यावर जेष्ठ नेते शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. निवडणूक आयोगाचा निर्णय आश्चर्यकारक आहे. लोक सर्व गोष्टींना समर्थन देणार नाहीत. सर्वोच्च न्यायालय योग्य तो निर्णय देईल, असे शरद पवारांनी म्हटले.
निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह आणि नाव अजित पवार गटाला दिल्यानंतर शरद पवार म्हणाले की, "निवडणूक आयोगाने आमच्या पक्षाचे नाव आणि चिन्ह काढून घेतले. ज्यांनी पक्षाची उभारणी केली, त्यांच्याच हातातून पक्ष हिसकावून दुसऱ्यांना दिला. देशात याआधी असे कधीच घडले नव्हते, जे निवडणूक आयोगाने करून दाखवले. आम्ही सर्वोच न्यायालयात गेलो. यासंबधीचे निर्णय हे लवकर येतील, अशी आमची अपेक्षा आहे."
निवडणूक आयोगाने फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसबाबत मोठा निर्णय घेतला. आयोगाने अधिकृतपणे राष्ट्रवादीचे नाव आणि घड्याळ चिन्ह अजित पवार यांच्याकडे सुपूर्द केले.राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार आणि अजित पवार यांच्यात वर्चस्वासाठी लढत होती. या प्रकरणात गेल्या सहा महिन्यात १० वेळा सुनावणी झाली. त्यानंतर आयोगाने अजित पवार यांच्याकडे गटात शरद पवार गटापेक्षा अधिक आमदार आहेत, असे कारण देत अजित पवार गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले.