निवडणूक आयोगाचं महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना पत्र, अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत मागितलं स्पष्टीकरण-ec seeks clarification from maharashtra chief secretary dgp over non compliance with transfer orders ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  निवडणूक आयोगाचं महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना पत्र, अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत मागितलं स्पष्टीकरण

निवडणूक आयोगाचं महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना पत्र, अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत मागितलं स्पष्टीकरण

Sep 27, 2024 08:20 PM IST

Election Commission of India: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवून अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत स्पष्टीकरण मागितले आहे.

निवडणूक आयोगाचे महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना पत्र
निवडणूक आयोगाचे महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना पत्र

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी निवडणूक आयुक्त राजीव कुमार (Rajiv Kumar) यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि एसएस संधू यांच्यासह निवडणूक आयोगाचे शिष्टमंडळ मुंबईत दाखल झाले. दरम्यान, अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत केलेल्या सूचनांचा अहवाल न दिल्याने केंद्रीय निवडणूक आयोगाने नाराजी व्यक्त केली. तसेच याबाबत महाराष्ट्राचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांकडून स्पष्टीकरण मागितले आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी शुक्रवारी महाराष्ट्राच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या आढावा बैठकीत मुंबईत १०० हून अधिक पोलिस निरीक्षक महत्त्वाची पदे का भूषवत आहेत? असा सवाल केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले की, ३१ जुलै २०२४ रोजी त्यांच्या गृह जिल्ह्यात किंवा तीन वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांची बदली करण्याचे निर्देश जारी करूनही राज्य प्रशासनाने ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही.

राजीव कुमार यांनी राज्य प्रशासनाच्या या नियमांचे पालन होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. निवडणूक आयोगाचे स्पष्ट निर्देश असूनही राज्यातील महत्त्वाच्या पदांवर महसूल अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यास राज्य का टाळाटाळ करत आहे? असा प्रश्न राजीव कुमार यांनी उपस्थित केला. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबतच्या आदेशाची पूर्णपणे अंमलबजावणी करण्यात अपयशी ठरल्याबद्दल निवडणूक आयोगाने महाराष्ट्राचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांकडून स्पष्टीकरण मागितले आहे.

महाराष्ट्राच्या उत्पादन शुल्क आयुक्तांना फटकारले आणि राज्यातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेजारच्या राज्यातून होणारी अवैध दारूची आवक थांबविण्याच्या कडक सूचना दिल्या. राज्यातील कोणत्याही प्रकारच्या अवैध दारूची वाहतूक आणि वितरणावर बारकाईने लक्ष ठेवण्याचे आदेश उत्पादन शुल्क आयुक्तांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

विधानसभेच्या २८८ जागांसाठी मतदान

महाराष्ट्रात विधानसभेच्या २८८ जागांसाठी मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने अद्याप निवडणुकीच्या तारखा जाहीर केलेल्या नाहीत. आगामी महाराष्ट्र निवडणुकीत युबीटी शिवसेना, राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि काँग्रेस यांचा समावेश असलेली महाविकास आघाडी आणि भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांचा समावेश असलेली महायुती आघाडी यांच्यात लढत होणार आहे. मात्र, या निवडणुकीत जनता कोणाच्या बाजूने कौल देईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Whats_app_banner
विभाग