नांदेड शहरातील काही भागात आज सायंकाळी ६ वाजून १८ मिनिटांनी भूकंपाचे (Earthquake ) सौम्य धक्के जाणवले आहेत. जमिनीतून गूढ आवाज ऐकू आल्यानंतर जमिनी थरथरल्याचे विवेकनगर, श्रीनगर, शिवाजीनगर भागात जाणवले. या भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून अनेक नागरिक रात्री उशिरापर्यंत रस्त्यावर उभे होते. या भूकंपाची नोंद रिश्टर स्केलवर १.५ इतकी नोंदवली गेली.
स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या भूविज्ञान विभागातील भूकंपमापक यंत्रावर भूकंपाची नोंद झाली आहे. यावेळी घरे हादरल्याने नागरिक घाबरून घराबाहेर पडले. धक्के सौम्य असल्याने कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही.
नांदेड शहरातील विवेकनगर, श्रीनगर, कैलासनगर, आयटीआय परिसर, शिवाजीनगर, पोलीस कॉलनी आदी भागात जमिनीतून आवाजासह धक्के जाणवले.
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले की, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील भूकंप मापन यंत्रावर दहा किमी अंतराच्या परिसरात रविवारी झालेल्या भूकंपाची तीव्रता १.५ रिष्टर स्केल एवढी नोंद झाली आहे. भूगर्भातील आवाजासंदर्भात नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहनही जिल्ह्याधिकाऱ्यांनी केले आहे.
विशेष म्हणजे गेल्या काही वर्षांत हिवाळ्यात शहरातील काही भागात जमिनीतून गूढ असे आवाज येत होते. त्यात गणेशनगर, श्रीनगर या भागातील नागरिक तर रात्रीच्यावेळी जागरण करीत होते. त्यात आज भूकंपाचा धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
संबंधित बातम्या