earthquake in nanded and hingoli : नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात आज मोठ्या प्रमाणात भूकंपाचे धक्के जाणवले. या मुळे काही घरांना तडे गेले आहेत. या घटनेमुळे नागरिक भयभीत झाले असून जिवाच्या भीतीने नागरिक पळून घराबाहेर आले. हे धक्के ६.९ मिनिटांपासून ६ वाजून १५ मिनिटांपर्यंत म्हणजेच ११ मिनिटं हे धक्के जाणवले. याची नोंद भूकंप मापकावर तब्बल ४.२ रिश्टर स्केल एवढी नोंदवली गेली.
नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात नागरिक साखर झोपेत असतांना भूकंपाचे धक्के जाणवले. यामुळे भयभीत होऊन नागरिक घराबाहेर पडले. तब्बल ११ मिनिटे धरणीकंप झाला. यामुळे अनेक घरांना तडे देखील गेले. हे धक्के नांदेड शहरासह हदगाव, नायगाव, अर्धापूर तालुक्यात बसले.
हिंगोली जिल्ह्यात देखील भूकंपाचे सौम्य धक्के बसले. अचानक आलेल्या भूकंपामुळे नागरिकांची त्रेधा उडाली. घरे अक्षरक्ष: हलू लागली होती. हिंगोली जिल्ह्यात वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथ येथे आज सकाळी दोन वेळा भूकंपाचे हादरे बसले. पहाटे ६ वाजून ८ मिनिटांनी पहिला धक्का, तर ६ वाजून १९ मिनिटांनी दुसरा धक्का जाणवला. येथील सिरळी गावात भूकंपामुळे काही घराच्या भिंतींना तडे गेले. ४.२ रिश्टर स्केल तिव्रतेचे भूकंपाचे धक्के बसल्याचे प्रशासनाने सांगितले. दरम्यान, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने या घटनेत कोणत्याही प्रकारच्या आर्थिक तसेच जीवित हानी झाली नसल्याची माहिती दिली. भूकंपाचा केंद्रबिंदू आखाडा बाळापूरपासून १५ किलोमीटरवर अंतरावर होता.
परभणी जिल्ह्यातही सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या घटनेत कोणत्याही नुकसानीची नोंद नाही. येथील भूकंपाचा केंद्रबिंदू हा हिंगोली जिल्ह्यात असून ६० किलोमीटर परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले. दरम्यान, गेल्या दोन आठवड्यांपूर्वीच नांदेड शहर आणि काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले होते. विवेकनगर, श्रीनगर, शिवाजीनगर भागात १/५ रिष्टर स्केलच्या भूकंपाची नोंद झाली.