Earthquake in Maharashtra : राज्यात विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात आज सकाळच्या सुमारास भूकंप झाला. अचानक जमिनीतून गूढ आवाज येऊन भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे हे धक्के मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड तर विदर्भातील वाशीम जिल्ह्यात जाणवले. या घटनेत जीवित तसेच आर्थिक हानी झाली नाही. मात्र, अनेक नागरिक साखर झोपेत असल्याने धक्क्यांमुळे खबडून जागे होऊन जीव वाचवण्याच्या भीतीने घराबाहेर पळत सुटले. या जिल्ह्यात सध्या भीतीचे वातावरण आहे. या भूकंपाची तीव्रता ही ४.२ रिश्टर स्केल नोंदवली गेली.
या घटनेचे वृत्त असे की, आज सकाळी पहाटेच्या सुमारास मराठवाडा आणि परभणी जिल्ह्यात भूकंपाचे धक्के बसले. सकाळी ६ ते ७ च्या सुमारास हे धक्के जाणवले. परभणी येथे सकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी तर जिल्ह्यातील सेलू, गंगाखेड भगत देखील भुकंपाचे सौम्य धक्के जाणवले. अचानक आलेल्या भूकंपामुळे व जमीन हादरल्याने नागरिकांनी घराबाहेर पळ काढला.
परभणी सोबतच हिंगोलीत देखील भूकंपाचे धक्के जाणवले. आज सकाळी ७ च्या सुमारास येथे भूकंपाचे धक्के जाणवले. हिंगोली जिल्ह्यातील बहुतांश भागात हे धक्के जाणवले. या घटनेमुळे नागरिक भयभीत झाले होते. या घटनेत कोणतेही नुकसान अथवा जीवित हानी झाली नाही. हिंगोली शहर आणि जिल्ह्यातील पाच तालुक्यात विविध भागात हे धक्के जाणवले. जमिन हलण्याचे काही दृश्य हे सीसीटीव्हीत देखील कैद झाले आहेत. येथे आलेला भूकंपाची तीव्रता देखील ४.५ रिश्टर स्केल एवढी नोंदवली गेली. हिंगोलीसह नांदेड व जालना जिल्ह्यात देखील भूकंपाचे धक्के जाणवले. जालना जिल्ह्यातील अंबड, घनसावंगी, परतूर तालुक्याते तर नांदेड शहरासह ग्रामीण भागात भूकंपाचे धक्के जाणवले.
विदर्भातील वाशिम जिल्ह्यात देखील सकाळच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात भूकंपामुळे नागरिक भयभीत झाले होते. येथे दोन वेळा भूकंपाची सौम्य धक्के जाणवले. तर जयपूर, टनका, सोंडा, सावळी कृष्णा या गावात देखील जमिनीतून गूढ आवाज येऊन धरणीकंप झाला. नागरिकांनी भूकंपाचे धक्के होताच घराबाहेर पडून जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. तर गोठयातील जनावरे सुध्दा दावणी तोडून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होती अशी माहिती ग्रामस्थांनी दिली.