मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  महाराष्ट्रातलं एकही गाव जाणार नाही, तिकडचीच गावे घेण्याचा आमचा प्रयत्न : फडणवीस

महाराष्ट्रातलं एकही गाव जाणार नाही, तिकडचीच गावे घेण्याचा आमचा प्रयत्न : फडणवीस

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Nov 23, 2022 02:30 PM IST

बोम्मई यांच्या वक्तव्यावर बोलताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कर्नाटकचे मुख्यमंत्री जे बोललेत ते समजून घ्या.

महाराष्ट्रातलं एकही गाव जाणार नाही, तिकडचीच गावे घेण्याचा आमचा प्रयत्न : फडणवीस
महाराष्ट्रातलं एकही गाव जाणार नाही, तिकडचीच गावे घेण्याचा आमचा प्रयत्न : फडणवीस

महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यावर दावा करणारे वक्तव्य कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केलं. त्यानंतर आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकात जाऊ देणार नाही. तिकडचीच गावे घेण्याचा प्रयत्न आमचा आहे असं फडणवीस म्हणाले. तसंच सांगलीच्या जतमधील गावांनी कर्नाटकात जाण्याचा ठराव हा २०१२ मध्ये केला आहे. त्या गावांना पाणी देण्यासंदर्भात आधीच म्हैसाळच्या सुधारित योजनेचा निर्णय घेतला असल्याचंही फडणवीसांनी सांगितलं.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील जत तालुक्यावर कर्नाटक दावा सांगण्यावर गांभीर्याने विचार करत असल्याचं म्हटलं होतं. हा तालुका दुष्काळी आहे आणि तिथे पाण्याची तीव्र टंचाई भासते. त्यामुळेच जत तालुक्यातील ४० ग्रामपंचायतींनी कर्नाटकात सामील होण्याचा ठराव केलाय. यावर आता कर्नाटक सरकार विचार करत आहे असं बसवराज बोम्मई म्हणाले होते.

बोम्मई यांच्या वक्तव्यावर बोलताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कर्नाटकचे मुख्यमंत्री जे बोललेत ते समजून घ्या. सीमा वादावर आपल्या मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतल्यानंतर महत्त्वाचे निर्णय घेतलेत. सीमा भागातील आपल्या लोकांना मदत करण्याचा निर्णय घेतलाय. तसंच आधीच्या योजनांसह नव्याने काही योजना आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवत आहे. त्यामुळे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी ते वक्तव्य केलं असावं. महाराष्ट्रातलं एकही गाव कुठे जाणार नाही. मात्र आम्ही सर्वोच्च न्यायालयात लढून बेळगाव, कारवार, निपाणीसह आमची गावे आहे ती मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे असंही फडणवीस यांनी सांगितलं.

WhatsApp channel