शेतकऱ्यांना दिलासा..! मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेतून 'या' शेतकऱ्यांचं वीजबील होणार माफ-duration and eligibility of mukhyamantri bali raja free power scheme to provide relief to farmers ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  शेतकऱ्यांना दिलासा..! मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेतून 'या' शेतकऱ्यांचं वीजबील होणार माफ

शेतकऱ्यांना दिलासा..! मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेतून 'या' शेतकऱ्यांचं वीजबील होणार माफ

Aug 02, 2024 10:46 PM IST

baliraja mofat vij yojana : शासनाकडून राज्यातील ४४ लाख ३ हजार शेतकऱ्यांच्या ७.५ अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेतीपंपांना पूर्णतः मोफत वीज पुरवली जाणार आहे.

मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना
मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना

Mukhyamantri baliraja mofat vij yojana : भारतातील शेती मुख्यत: पावसावर अवलंबून आहे. मात्र गेल्या काही वर्षात जागतिक वातावरणीय बदलामुळे मोसमी हवामानात तीव्र बदल होत असून त्यांचे परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत. वातावरणाच्या अनियमिततेमुळे पिक हंगामावर त्यांचा प्रत्यक्ष परिणाम होवून शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडत आहे. शेतकऱ्यांना या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी राज्यातील ७.५ एचपीपर्यंतच्या शेती पंप ग्राहकांना एप्रिल २०२४ पासून मोफत वीज देण्यासाठी शेतकऱ्यांना मदत व दिलासा देणारी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना राज्य शासनाने २५ जुलै २०२४ रोजी अंमलात आणली आहे.

महाराष्ट्र राज्य नियामक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यात कृषी वाहिन्यांवरील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना रात्रीच्या वेळी १०/८ तास किंवा दिवसा ८ तास थ्री फेज वीजेची उपलब्धता चक्राकार पद्धतीने करण्यात येते. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांवर येणाऱ्या वीज बिलाचा भार उचलण्यासाठी शासनाकडून राज्यातील ४४ लाख ३ हजार शेतकऱ्यांच्या ७.५ अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेतीपंपांना पूर्णतः मोफत वीज पुरवली जाणार आहे. यासाठी साधारण १४ हजार ७६० कोटी रुपये अनुदान स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

बळीराजा मोफत वीज योजनेचा कालावधी –

 ही योजना पाच वर्षांसाठी म्हणजेच एप्रिल २०२४ ते मार्च २०२९ पर्यंत राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. परंतु ३ वर्षांच्या कालावधीनंतर या योजनेचा आढावा घेऊन पुढील कालावधीत योजना राबविण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

योजनेची पात्रता –

 राज्यातील ७.५ एचपीपर्यंत शेतीपंपाचा मंजूर भार असलेले सर्व शेतीपंप ग्राहक या योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहतील.

योजनेची अंमलबजावणी –

एप्रिल २०२४ पासून ७.५ एचपी पर्यंतच्या शेतीपंप ग्राहकांना मोफत वीज मिळणार आहे. शासनास विद्युत अधिनियम २००३, कलम ६५ अन्वये कोणत्याही ग्राहकांना अथवा ग्राहक वर्गवारीला अनुदान देऊन त्यानुसार अनुदानित वीज दर लागू करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत. त्यानुसार वीज बिल माफ केल्यानंतर या वीजदर सवलती पोटी रक्कम शासनाकडून महावितरण कंपनीला अग्रीम स्वरुपात वर्ग करण्यात येईल. सध्या देण्यात येणारी वीजदर सवलत रुपये ६ हजार ९८५ कोटी अधिक वीज बिल माफीनुसार सवलत रुपये ७ हजार ७७५ कोटी असे वार्षिक वीजदर सवलती पोटी प्रतिवर्षी रु. १४ हजार ७६० कोटी  शासनाकडून महावितरण कंपनीला अदा करण्यात येणार आहेत. या रकमेमध्ये योजना कालावधीत बदल झाल्यास त्याप्रमाणे महावितरण कंपनीस शासनाकडून रक्कम वर्ग करण्यात येईल. तसेच मागेल त्याला सौर कृषिपंप देण्याचे धोरणदेखील शासनाकडून ठरविण्यात आले आहे. ही योजना राबविण्याची सर्वस्वी जबाबदारी महावितरण कंपनीची असणार आहे.