Pune Wagholi kesnand Accident : पुण्यात ड्रंक अँड ड्राइव्हच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाही आहे. दारूच्या नशेत भरधाव वेगात डंपर चालवून फुटपाथ वरील झोपलेल्या ९ जणांना चिरडल्याची घटना पुण्यातील वाघोली येथील केसनंद फाट्याजवळ घडली. या अपघातात दोन मुलांसह तिघांचा मृत्यू झाला आहे. यात मुलांच्या काकांसह दोन बालकांचा समावेश आहे. तर ६ जण गंभीर जखमी झाले आहे. यातील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना रविवारी रात्री रात्री १२ ते १ च्या सुमारास वाघोलीतील केसनंद फाट्याजवळ घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वैभवी रितेश पवार (वय १), वैभव रितेश पवार (वय २), रीनेश नितेश पवार, (वय ३०) अशी या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. तर जानकी दिनेश पवार (वय २१) रिनिशा विनोद पवार (वय १८), रोशन शशादू भोसले (वय ९), नगेश निवृत्ती पवार (वय २७), दर्शन संजय वैराळ (वय १८), आलिशा विनोद पवार (वय ४७) अशी जखमींची नावे आहेत.
डंपर चालक गजानन शंकर तोट्रे (वय २६, रा. नांदेड) यास अटक करण्यात आली आहे. त्याची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी ससून हॉस्पिटल येथे पाठवण्यात आले आहे. त्यांना ससून रुग्णालयात हलविण्यात आले आहे. रविवारी रात्रीच ते अमरावती येथून बिगारी व मजुरी कामासाठी वाघोली येथे आले होते. एका कुटुंबातील १२ जण फूटपाथवर झोपले होते. तर आणखी काही जण फूटपाथच्या बाजूला झोपड्यांमध्ये झोपले होते. यातील काही जण हे बाहेरील राज्यातील आहे.
पुण्यात वाघोली केसनंद फाटा येथे काही मजूर ही रस्त्याच्या पलीकडे फुटपाथवर झोपले होते. यावेळी डंपर चालक (क्रमांक MH 12 VF 0437) गजानन शंकर तोट्रे याने मद्यधुंद अवस्थेत फुटपाथवर झोपलेल्या लोकांवर डंपर चढवला. हा डंपर बिल्टवेस् इंटरप्राईजेस कंपनीचा होता. तर पोलिस ठाण्याच्या काही अंतरावर हा अपघात झाला. या घटनेत डंपरने फूट पाथवर झोपलेल्या नऊ जणांना चिरडले. या मध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर सहा जण जखमी झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच रस्त्यावर नागरिकांनी देखील मदतीसाठी धाव घेतली.
जखमींवर आयनॉक्स हॉस्पिटल येथे प्राथमिक उपचार करून ससून रुग्णालयात पाठवण्यात आले. तर मृतदेह आयनॉक्स हॉस्पिटल येथून ससून येथे पाठवण्यात आले आहेत. आरोपीविरुद्ध सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून यात तो दारू प्यायल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंडित रेजितवाड करत आहेत.
संबंधित बातम्या