SSC HSC Exam : जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी १४ मार्च पासून बंदची हाक दिली आहे. यात शिक्षक संघटना देखील उतरल्या आहेत. त्यांनी १० आणि १२ वीच्या संप काळात उत्तरपत्रिका न तपासण्याचा शिक्षक संघटनांनी पवित्रा घेतला आहे. त्यामुळे याचा परिणाम निकालावर होणार असून या संपामुळे निकाल उशिरा लागण्याची शक्यता आहे.
जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी येत्या १४ मार्चपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. राज्यातील अनेक कर्मचारी संघटना या संपात सहभागी होणार आहेत. सध्या १० आणि १२ वीच्या परीक्षा सुरू आहेत. या संपात शिक्षक संघटना सहभागी होणार असल्याने त्यांनी संप काळात उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे निर्धारित वेळेत निकाल लागणे कठीण असल्याचे बोलले जात आहे.
राज्य विद्यापीठीय आणि महाविद्यालयीन सेवक संयुक्त समितीच्या नेतृत्वाखाली मागच्या महिन्यात महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परीक्षा कामकाजावर बहिष्कार टाकला होता. यावर तोडगा निघाल्यावर काही दिवसातच कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने २१ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिका न तपासण्याचा निर्णय घेतला. यामुळे शिक्षकांनी एकही उत्तरपत्रिका तपासली नाही. राज्य शिक्षण मंडळात पार पडणाऱ्या मुख्य नियामकांच्या बैठकीवरही शिक्षकांनी बहिष्कार घातला.
दरम्यान, इतिवृत्त आल्यावर या शिक्षकांनी वेगाने उत्तरपत्रिका तपासायला सुरुवात केली. मात्र, आता पुन्हा राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ, मुंबई आणि उपनगर माध्यमिक शिक्षक संघ, शिक्षक भारती, महाराष्ट्र शिक्षक सेना, ग्रेटर मुंबई शिक्षक संघटना, शिक्षक परिषद, राज्य खासगी प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघ या संपाच्या मैदानात उतरल्याने आता पुन्हा उत्तर पत्रिका तपासण्यास उशीर होणार असल्याने याचा फटका निकालाला बसणार आहे.
संबंधित बातम्या