मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Metro News : नरेंद्र मोदी यांचा रोड शो! सुरक्षेच्या कारणास्तव आज संध्याकाळी घाटकोपर ते जागृतीनगर मेट्रो सेवा बंद

Mumbai Metro News : नरेंद्र मोदी यांचा रोड शो! सुरक्षेच्या कारणास्तव आज संध्याकाळी घाटकोपर ते जागृतीनगर मेट्रो सेवा बंद

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
May 15, 2024 04:14 PM IST

Mumbai Metro Services Suspended : घाटकोपर वर्सोवा मार्गावरील घाटकोपर ते जागृतीनगर स्थानकांदरम्याची मेट्रो सेवा आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून बंद राहणार आहे.

 मोदी आज मुंबईत! सुरक्षेच्या कारणास्तव घाटकोपर ते जागृती नगर मेट्रो सेवा संध्याकाळी सहा वाजेपासून बंद
मोदी आज मुंबईत! सुरक्षेच्या कारणास्तव घाटकोपर ते जागृती नगर मेट्रो सेवा संध्याकाळी सहा वाजेपासून बंद

Mumbai Metro Service Update : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत येत आहेत. मुंबईतील घाटकोपर भागात त्यांचा रोड शो होणार आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षेची सर्व काळजी घेण्यात येत असून घाटकोपर ते जागृती नगर स्थानकांच्या दरम्यानची मेट्रो सेवा सायंकाळी बंद ठेवण्यात आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

‘मुंबई मेट्रो वन’कडून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर ही माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, आज संध्याकाळी ६ वाजल्यापासून पुढील सूचना मिळेपर्यंत घाटकोपर आणि जागृती नगर स्थानकापर्यंतची मेट्रो सेवा बंद राहणार आहे. प्रवाशांनी ही सूचना लक्षात घेऊन आपल्या प्रवासाचं नियोजन करावं, असं मुंबई मेट्रोनं म्हटलं आहे. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल मेट्रोनं खेदही व्यक्त केला आहे.

मुंबई मेट्रोनं केलेल्या पोस्टमध्ये नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याचा कुठलाही उल्लेख नाही. सुरक्षेच्या कारणास्तव सेवा बंद ठेवण्यात येणार आहे, इतकंच त्या पोस्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

किती होणार परिणाम?

घाटकोपर ते वर्सोवा हा मुंबईतील पहिला मेट्रो मार्ग आहे. राज्यातील आघाडी सरकारच्या काळात हा मार्ग सुरू झाला होता. पश्चिम आणि मध्य रेल्वेवरील प्रमुख स्थानकांना जोडणारा हा मार्ग असल्यामुळं दररोज लाखो प्रवाशी या मार्गावर प्रवास करतात. पूर्वी पश्चिम उपनगरात जाण्यासाठी पूर्व उपनगरातील मुंबईकर प्रवाशांना दादर स्थानक हा एकच पर्याय होता. मात्र मेट्रो सुरू झाल्यापासून घाटकोपरला उतरून मेट्रोनं अंधेरी गाठण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे. साहजिकच या स्थानकांवर गर्दी वाढली आहे.

पूर्व उपनगरात घाटकोपर हे मेट्रोचे पहिले स्टेशन आहे. त्यानंतर जागृती नगर हे स्टेशन येते. या दोन स्थानकांदरम्यानची सेवा आज बंद असेल. त्यामुळं अंधेरीच्या दिशेनं जाणाऱ्या प्रवाशांना आज रस्ते मार्गानं जागृती स्थानक गाठावं लागेल. तिथून पुढं मेट्रोनं जाता येईल. तर, घाटकोपरच्या दिशेनं येणाऱ्या प्रवाशांना जागृतीनगरला उतरून पुढं रस्ते मार्गे घाटकोपर स्टेशन गाठावं लागणार आहे.

कसा असेल नरेंद्र मोदी यांचा रोड शो

पंतप्रधान मोदी यांचा रोड शो घाटकोपर पश्चिम आणि पूर्व परिसरात होणार आहे. अशोक सिल्क मिल येथून हा रोड शो सुरू होऊन सर्वोदय जंक्शन ओलांडून पुढं जाईल. एमजी रोडवर डावीकडं वळून मोदींचा ताफा पूर्वेला जाईल. त्यानंतर घाटकोपर पूर्वेकडं वल्लभ बाग जंक्शन इथं पोहचेल. या ठिकाणी पार्श्वनाथ जैन मंदिराजवळ रोड शोचा समारोप होईल.

IPL_Entry_Point