Chandrakant Patil car accident : पुण्यात ड्रंक अँड ड्राईव्हच्या घटना गेल्या काही दिवसांपासून वाढल्या आहेत. दारू पिऊन गाडी चालवून अनेक जण अपघातास कारणीभूत ठरत आहेत. कोथरूड येथे अशाच एका घटनेत मनसे पदाधिकाऱ्याच्या पत्नीचा मृत्यू झाला होता. यानंतर खुद्द भाजप नेते चंद्रकांत पाटील यांना अशा अपघाताचा अनुभव आला आहे. सोमवारी रात्री एका दारुड्या कार चालकाने पाटील यांच्या ताफ्यातील एका गाडीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात पाटील हे थोडक्यात बचावले आहेत
मिळालेल्या माहितीनुसार पुण्यात सोमवारी रात्री हा अपघात झाला आहे. चंद्रकांत पाटील हे गणपतीच्या दर्शनासाठी पुण्यात आले होते. यावेळी एका दारूच्या नशेत असलेल्या वाहन चालकाने त्यांच्या ताफ्यातील वाहनाला जोरदार धडक दिली. या घटनेत पाटील यांच्या ताफ्यातील गाडीचे मोठं नुकसान झालं आहे. सुदैवाने चंद्रकांत पाटील या घटनेतून थोडक्यात बचावले आहेत.
पोलिसांनी मद्यपी चालकाला अटक केली आहे. त्याची चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणी कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये कार चालक, त्याचे तीन मित्र आणि दोन मैत्रिणींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कार चालक हा अपघाताच्या वेळी दारूच्या नशेत होता.
चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या या अपघाताचा अनुभव माध्यमांना सांगितला आहे. सोमवारी मी देवदर्शन व गणपती मंडळांना भेटी दिल्यानंतर रात्री उशिरा पुण्यातील कोथरुड भागात असलेल्या त्यांच्या घरी जात होतो. यावेळी आशिष गार्डन जवळ रात्री १२ च्या सुमारास एका मद्यधुंद कार चालकाने त्यांच्या ताफ्यातील गाडीला जोरदार धडक दिली. मी थोडक्यात बचावलो गेलो. काही क्षणाचा अवधी होता. माझी गाडी थोडी पुढे गेली व मागे माझ्या ताफ्यातील गाडीला धडक बसली.
पुण्यात दारू पिऊन गाडी चालवून रोज अपघात होत आहेत. पोर्शे दुर्घटनेनंतर या घटना प्रकर्षाने पुढे येऊ लागल्या आहेत. काही दिवसांपूर्वी मनसे पदाधीकाऱ्याचा व त्याच्या पत्नीचा अशाच एक अपघात झाला होता. यात पत्नीचा मृत्यू झाला होता. दारूच्या नशेत टेम्पो चालवून अनेक वाहनांना टेम्पो चालकाने धडक दिली होती. आता चंद्रकांत पाटील यांना या घटनेचा अनुभव आल्याने सर्वसामान्य नागरिकच नाहीतर मंत्री व त्यांच्या गाड्याही सुरक्षित नसल्याचं समोर आलं आहे.