Pune vanaz accident : पुण्यात कल्याणी नगर येथील हीट अँड रन व ड्रंक अँड ड्राइव्हची घटना ताजी असतांना पुन्हा अशीच एक घटना उघडकीस आली आहे. पुण्यात मंगळवारी मध्यरात्री एका मद्यधुंद बसचालकाने चार ते पाच वाहनांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात वाहनांचा चक्काचूर झाला. तर चार पाच नागरिक हे गंभीर जखमी झाले. यातील दोघांची प्रकृती ही चिंताजनक आहे. ही घटना कोथरूड येथील वनाज कॉर्नर येथे मंगळवारी रात्री ११.३० च्या सुमारास घडली.
पुण्यात हीट अँड रनच्या घटना वाढल्या आहे. दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांवर पुणे पोलिसांनी कारवाई करून देखील या घटना कमी झालेल्या नाही. हे मद्यधुंद चालक अपघातासाठी कारणीभूत ठरत आहेत. मंगळवारी रात्री कोथरूड येथील वनाज कॉर्नर जवळ कोथरूड डेपोकडून एक खासगी बस भरधाव वेगात आली. यावेळी बस वरील चालकांचे नियंत्रण सुटल्याने वनाज मेट्रो स्थानकाजवळ चार ते पाच वाहनांना ही बस धडकली. ही धडक एवढी भीषण होती की, अपघातग्रस्त वाहनांचा चक्काचूर झाला. तर काही नागरिक जखमी झाले. एका दुचाकीस्वरांच्या गळ्यात लोखंडी सळई घुसल्याने तो गंभीर जखमी झाला.
या घटनेनंतर या परिसरात मोठा गोंधळ उडाला होता. मोठा आवाज झाल्याने तसेच एक बस चार ते पाच वाहनांना धडकल्याचे पाहून नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तातडीने बस चालकाला पकडले. बाळू बाळासाहेब थोरात असे बस चालकाचे नाव असून तो दारूच्या नशेत होता. या घटनेची माहिती मिळताच पोलिस देखील घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आरोपीला ताब्यात घेतले असून रात्री उशिरा या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. अपघात जखमी झालेल्या नागरिकांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पुण्यात ड्रंक अँड ड्राइव्हच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. पुणे पोर्शे प्रकरणानंतर मोठ्या प्रमाणात अशा वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. मात्र, ही कारवाई फार्स ठरत असल्याचा आरोप पुणेकरांनी केला आहे. या पूर्वी देखील एका माजी नगरसेवकांच्या मुलाने दारूच्या नशेत गाडी चालवत रिक्षाला धडक दिली होती. यानंतर कोथरूड येथे हा भीषण अपघात झाल्याने रस्तावरून चालणारे पुणेकर खरचं सुरक्षित आहेत का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.