Pune Bengaluru Highway Accident : पुणे बेंगुळरू हायवेवर आज सकाळी दोन कंटेनर्सच्या झालेल्या भीषण अपघातात एका गाडीचा चालक गंभीर जखमी झाला आहे. जखमी अवस्थेत हा चालक गाडीच्या केबिनमध्ये अडकून पडला होता. त्याला बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. पुणे-बेंगळुरू महामार्गावर जांभूळवाडी दरी पुलाच्या अलीकडे हा अपघात झाला. एका मोठ्या कंटेनरला (RJ 19 GG 0083) मागील बाजूनं येणाऱ्या दुसऱ्या कंटेनरनं (MH 12 MV 8256) जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भयानक होता की गाडीचा अक्षरश: चक्काचूर झाला. मागील बाजूस असणाऱ्या कंटेनरमधील वाहनचालक जखमी अवस्थेत पुढील केबिनेमध्ये अडकला.
अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला ८ वाजून ५५ मिनिटांनी या अपघाताची माहिती मिळाली. अपघाताची माहिती मिळताच नवले अग्निशमन केंद्र तसेच मुख्यालयातून व पीएमआरडीए अग्निशमन दलाकडून बचाव पथकातील व्हॅन रवाना करण्यात आल्या.
परिस्थितीचं गांभीर्य ओळखून बचाव पथकातील रेस्क्यु उपकरणांचा म्हणजेच हायड्रोलिक स्प्रेडर, हायड्रोलिक कटर व इतर साहित्य वापरून सुमारे वीस ते तीस मिनिटात जखमी वाहनचालकास बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर त्याला उपचारासाठी रवाना करण्यात आलं. त्यानंतर गाडीत इतर कोणी नसल्याची खात्री करण्यात आली. अपघातात जखमी झालेल्या वाहनचालकाचं नाव रावसाहेब पिंगारे आहे.
अपघातामुळं वाहनांतील तेल रस्त्यावरू सांडून रस्ता निसरडा झाला होता. त्यामुळं आणखी अपघाताचा धोका होता. त्यामुळं या रस्त्यावर माती टाकून धोका दूर करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला घेऊन इतर वाहनांसाठी मार्ग खुला केला.
संबंधित बातम्या