तरुणाईमध्ये सध्या ऑनलाईन गेमिंगची मोठ्या प्रमाणात क्रेझ आहे. या गेमिंगमध्ये तरुणाई भरकटत चालली असून अनेकदा फसवणुकीच्या व आर्थिक नुकसानीच्याही घटना समोर येत असतात. कोल्हापुरातील एक फळ विक्रेत्यालाही ऑनलाईन गेमिंग ॲपचं व्यसन लागलं. मात्र आयपीएल २०२४ च्या पहिल्याच सामन्यात नशीबानं त्याला साथ दिली व त्यानं निवडलेला संघ पहिल्या क्रमांकावर आला. त्याला एक कोटींचे बक्षीस मिळाले आहे. शुभम धनाजी कुभार असं त्याचं नाव असून तो व्यवसायाने केळी विक्रेता आहे.
आयपीएल २०२४ च्या सीझनमध्ये आतापर्यंत चार सामने झाले आहेत. पहिल्या टप्प्यातील वेळापत्रकात मुंबई-चेन्नई सामना नसल्याने क्रिकेटप्रेमींचा थोडासा हिरमोड झाला असला तरी चेन्नई-बंगळुरू संघात झालेल्या पहिल्या सामन्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
ड्रीम इलेव्हनच्या माध्यमातून एक कोटी रुपये जिंकलेला शुभम गेल्या चार ते पाच वर्षांपासून ड्रीम ११ वर खेळत आहे. त्याचे आईवडील गेल्या ४० वर्षापासून कोल्हापुरात फळविक्रीचा व्यवसाय करतात. शुभमला इतक्या मोठ्या रक्कमेचं बक्षीस मिळेल असे वाटलेही नव्हतं. ड्रीम इलेव्हनवर टीम अनेकजण लावतात मात्र नशीबाची साथ सर्वांना लाभत नाही.
कुंभार कुटूंबाचा कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर फळांचा स्टॉल आहे. शुभमही आई-वडिलांसोबत फळे विकण्याचे काम करतो. मात्र आयपीएलच्या पहिल्याच सामन्याने त्याचे नशीब पालटले आहे. तो आता करोडपती बनला आहे. फळविक्रीसोबतच शुभम गणेश मूर्ती बनवण्याचेही काम करतो. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतही त्यांनी ड्रीम 11 ॲपवर टीम बनवली होती. त्याला यापूर्वीही अनेकदा छोटी मोठी बक्षीसे मिळाली आहेत. मात्र आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील पहिल्याच सामन्यात शुभमने गेम खेळून एक कोटी रुपये मिळवले आहे. या पैशातून त्याला आपले व आपल्या आई-वडिलांची स्वप्ने पूर्ण करायची आहेत.
ड्रीम इलेव्हनवर यापूर्वी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील एका पोलीस उपनिरीक्षकाला दीड कोटींचे बक्षीस मिळाले होते. विजेता पोलीस उपनिरीक्षक फॅन्टसी क्रिकेट ॲपवर एका टीममध्ये हा गेम खेळत होता. त्याला दीड कोटींचे बक्षिस लागले. सोमनाथ झेंडे असे विजेत्या पीएसआयचे नाव आहे. ते पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात कार्यरत आहेत. मात्र याप्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय पिंपरी चिंचवड पोलिसांनी घेतला होता.