मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mahaparinirvan Din: बाबासाहेबांच्या स्मृती जागवणाऱ्या मुंबईतील ऐतिहासिक ठिकाणांची मोफत सफर

Mahaparinirvan Din: बाबासाहेबांच्या स्मृती जागवणाऱ्या मुंबईतील ऐतिहासिक ठिकाणांची मोफत सफर

Haaris Rahim Shaikh HT Marathi
Dec 03, 2022 05:45 PM IST

Dr. Ambedkar Mahaparinirvan Diwas: डॉ. बाबासाहेबांच्या वास्तव्याने पावन झालेल्या मुंबईतील काही महत्वाच्या ठिकाणांची बसने मोफत सफर आयोजित करण्यात आली आहे.

Dr Babasaheb Ambedkar
Dr Babasaheb Ambedkar

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांचे मुंबई शहराशी खूप भावनिक नातं होतं. डॉ. आंबेडकर यांनी मुंबई राहून अनेक सामाजिक, राजकीय चळवळी केल्या. महापरिनिर्वाण दिनाचे निमित्त साधून बाबासाहेबांच्या वास्तव्याने पावन झालेल्या मुंबईतील काही महत्वाच्या ठिकाणांची पर्यटन विभागा तर्फे बसने मोफत सफर आयोजित करण्यात आली आहे. ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्किट’ असं या टूरचे नाव असून या दौऱ्यामध्ये चैत्यभूमी, राजगृह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, बीआयटी चाळ आणि सिद्धार्थ कॉलेजला भेट दिली जाणार आहे.

मुंबईत आल्यावर बाबासाहेब सुरूवातीला परळ येथील बीआयटी चाळीत २२ वर्ष राहिले होते. त्यानंतर दादरमध्ये बांधलेल्या ‘राजगृह’ या भव्य बंगल्यात ते रहायला गेले होते. डॉ. बाबासाहेबांच्या वास्तव्याने पावन झालेल्या अशी अनेक ठिकाणं मुंबई शहरात आहे. मुंबई शहरातील या ऐतिहासिक ठिकाणांची सफर घडवण्यासाठी राज्याच्या पर्यटन विभागातर्फे ३, ४, ७ आणि ८ डिसेंबर रोजी मोफत बस फेरीचे आयोजन करण्यात आलं आहे. 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्किट' असं या फेरीचं नाव आहे. मुंबई सर्किटसाठी आयोजित केलेल्या मोफत बस फेरीदौरान दादर (पश्चिम) येथील चैत्यभूमी, दादर (पूर्व) भागातले डॉ. बाबासाहेबांचे राजगृह हे निवासस्थान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, परळ येथील बीआयटी चाळ आणि दक्षिण मुंबईतील सिद्धार्थ कॉलेजला भेट दिली जाईल.

या मोफत बस फेरीत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या पर्यटकांना सकाळी ९ वाजता दादर येथील शिवाजी पार्कजवळील गणेश मंदिर येथे एकत्र जमायचे आहे. पर्यटकांना बसने चैत्यभूमी आणि त्यानंतर राजगृहाकडे नेले जाईल. त्यानंतर बीआयटी चाळ क्र. १ खोली क्र. ५०/५१ येथे नेण्यात येईल. या दौऱ्याची सांगता फोर्ट भागातील सिद्धार्थ कॉलेज येथे होईल. पर्यटकांना सोडण्यासाठी दुपारी २ च्या सुमारास बस दादरच्या शिवाजी पार्काजवळील गणेश मंदिराजवळ (जिथून दौऱ्याला सुरुवात झाली होती) परत येणार आहे.

सहलीसाठी दररोज ४ बसेस धावणार आहेत. ‘फर्स्ट कम फर्स्ट’ आधारावर या बस फेरींमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. या टूरमध्ये सहभागी होण्यासाठी पर्यटक फोनद्वारे नोंदणी करू शकतात. मुंबईत होणाऱ्या या मोफत सहलीचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. नाव नोंदणीसाठी 7738375812 ( विक्रम) किंवा 7738375814 (रसिका) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या