sushma andhare: आंबेडकरांबद्दल आदर आहे तर संभाजी भिडे, एकबोटेंबद्दल भूमिका का घेतली नाही? सुषमा अंधारे यांचा भाजपला सवाल
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  sushma andhare: आंबेडकरांबद्दल आदर आहे तर संभाजी भिडे, एकबोटेंबद्दल भूमिका का घेतली नाही? सुषमा अंधारे यांचा भाजपला सवाल

sushma andhare: आंबेडकरांबद्दल आदर आहे तर संभाजी भिडे, एकबोटेंबद्दल भूमिका का घेतली नाही? सुषमा अंधारे यांचा भाजपला सवाल

May 30, 2024 02:07 PM IST

Sushma andhare backs Jitendra awhad : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडल्याबद्दल जितेंद्र आव्हाड यांना घेरणाऱ्या भाजपवर सुषमा अंधारे यांनी सडकून टीका केली आहे.

आंबेडकरांबद्दल आदर आहे तर संभाजी भिडे, एकबोटेंबद्दल भूमिका का घेतली नाही?; सुषमा अंधारे यांचा भाजपला सवाल
आंबेडकरांबद्दल आदर आहे तर संभाजी भिडे, एकबोटेंबद्दल भूमिका का घेतली नाही?; सुषमा अंधारे यांचा भाजपला सवाल

Sushma andhare slams BJP : शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या समावेशाला विरोध म्हणून आंदोलन करताना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अनावधानानं डॉ. आंबेडकर यांचा फोटो फाडल्यानं वातावरण तापलं आहे. सत्ताधारी भाजपनं आव्हाड यांच्या विरोधात आंदोलन सुरू केलं आहे. भाजपच्या या भूमिकेवर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सडकून टीका केली आहे. डॉ. आंबेडकरांबद्दल इतका अभिमान आहे तर भीमा कोरेगावमधील हिंसाचाराला कारणीभूत असलेल्या संभाजी भिडे आणि एकबोटे यांच्याबद्दल तुम्ही भूमिका का घेतली नाही, असा सवाल अंधारे यांनी भाजपला केला आहे.

सुषमा अंधारे यांनी जितेंद्र आव्हाड यांची पाठराखण केली आहे. 'सत्याला स्पष्टीकरणाची गरज नसते. कारण मित्र असे कोणतेही स्पष्टीकरण मागत नाही आणि शत्रू त्यावर विश्वास ठेवत नाही. जितेंद्र आव्हाड यांनी वारंवार मांडलेल्या भूमिका आणि केलेली आंदोलन सर्वांना ज्ञात आहे. शिवाय नकळतपणे घडलेल्या कृतीबद्दल त्यांनी कुठलेही आढेवेढे न घेता महाराष्ट्राची जाहीर माफी मागितली आहे, याकडं सुषमा अंधारे यांनी लक्ष वेधलं आहे.

आव्हाड यांनी माफी मागूनही या प्रकरणी राजकारण करणाऱ्या आणि बाबासाहेबांबद्दल बेगडी प्रेम व्यक्त करणाऱ्या लोकांना अंधारे यांनी काही प्रश्न केले आहेत. त्यांचा रोख अर्थातच भाजपकडं आहे.

मनुस्मृतीला तुमचा विरोध आहे का?

बाबासाहेबांनी मांडलेला प्रत्येक विचार जर शिरोधार्य असेल तर त्याच बाबासाहेबांनी २५ डिसेंबरला महाडमध्ये मनुस्मृती दहन केलं. कारण मनुष्यमात्राला असमान मानणारा विचार हा मानवी कल्याणाचा विचार असू शकत नाही असं बाबासाहेबांनी स्पष्ट केलं. त्याच मनुस्मृतीचा अभ्यासक्रमात समाविष्ट करणं म्हणजे बाबासाहेबांच्या विचारांचा अव्हेर करत सरळ सरळ बाबासाहेबांच्या चळवळीला मात देण्याचा प्रयत्न सरकार पक्षाकडून होत आहे. जितेंद्र आव्हाड यांच्याबद्दल तुम्हाला आक्षेप असतील तर आव्हाड ज्या मनुस्मृतीचा अभ्यासक्रमात समावेश होण्याला विरोध करण्यासाठी आंदोलन करत होते यावर तुमचं मत काय आहे,' असा परखड सवाल अंधारे यांनी केला आहे.

सुषमा अंधारे म्हणतात…

> बाबासाहेबांबद्दल बेगडी प्रेमाचा उमाळा दाखवणाऱ्या तमाम छुपे आणि उघड भाजप समर्थकांनी हे स्पष्ट करावं की मनुस्मृतीचा अभ्यासक्रमात समावेश होत असताना तुम्ही कोणत्या बिळात लपला होतात? तुम्ही संबंधित मंत्र्यांना जाहीर प्रश्न कधी विचारले? आता त्या मंत्र्यांचा राजीनामा तुम्ही कधी मागणार आहात?

> बाबासाहेबांचा अपमान जेव्हा भाजपच्या चंद्रकांत पाटील यांनी केला त्या वेळेला आत्ताचे भाजपचे छुपे आणि उघड समर्थक हे चंद्रकांत पाटलांच्या बद्दल मूग गिळून गप्प का बसले होते?

> बाबासाहेबांबद्दल खरंच प्रेमाचे उमाळे येत असतील तर इंदू मिलच्या जागेवर कुदळ मारायला आलेल्या मोदी यांनी अजून तिथं वीटही रचली नाही. यावर हे छुपे आणि उघड समर्थक मोदींना थेटपणे जाब विचारत मोदींना सत्तेतून पायउतार करण्याची भाषा करतील का?

> जंतर-मंतरवर संविधानाची प्रत जाळली गेली, तेव्हा ती प्रत जळणाऱ्या आरएसएस समर्थकांच्या विरोधात आत्ताचे भाजपचे छुपे किंवा उघड समर्थक रस्त्यावर का उतरले नाहीत?

> बाबासाहेब आणि बाबासाहेब यांच्या प्रत्येक कृतीबद्दल जर अभिमान असेल तर मग भीमा-कोरेगावमध्ये झालेल्या हिंसाचाराला कारणीभूत संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्याबद्दल थेट भूमिका या छुपे किंवा उघड समर्थकांनी का घेतली नाही?

तुम्ही या प्रश्नांची उत्तर देऊ शकत नाही कारण तुमचा बौद्धिक हलकटपणा चळवळीत काम करणारे सच्चे कार्यकर्ते अभ्यासक आणि लढवय्ये चळवळे लोक जाणून आहेत!

Whats_app_banner