मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यात सेलू येथे झालेल्या सीपीआय(एम)च्या २४व्या महाराष्ट्र राज्य अधिवेशनात ४७ वर्षीय डॉ. अजित नवले यांची नवीन राज्य सचिव म्हणून एकमताने निवड झाली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे विद्यमान राज्य सचिव डॉ. उदय नारकर यांनी या पदावर फेरनिवड होण्यास नकार दिला. आयुर्वेदिक डॉक्टर असलेले डॉ. अजित नवले हे सीपीएम पक्षाचे देशातील सर्वात तरुण राज्य सचिव आहेत.
डॉ. अजित नवले हे २५ वर्षांपूर्वी २००० मध्ये विद्यार्थी आघाडीच्या माध्यमातून पक्षात सामील झाले. ते २०१६ पासून किसान आघाडीचे राज्य सरचिटणीस आणि २०२२ पासून राष्ट्रीय सहसचिव आहेत. त्यांच्या कुटुंबाला, नवलेवाडी गावाला, अकोले तालुक्याला आणि अहमदनगर जिल्ह्याला (आता अहिल्यानगर) स्वातंत्र्यपूर्व काळापासून कम्युनिस्ट चळवळीचा दीर्घ वारसा लाभला आहे. डॉ. अजित नवले आणि त्यांच्या टीमने अकोले, संगमनेर आणि इतर तालुक्यांमध्ये पक्ष व जनआंदोलनांची पुनर्बांधणी केली. त्यांचे पणजोबा बुवा नवले १९४५ साली किसान आघाडीचे पहिले राज्याध्यक्ष म्हणून निवडून आले, त्याचवेळी शामराव परुळेकर यांची सरचिटणीस म्हणून आणि गोदावरी परुळेकर यांची सहसचिव म्हणून निवड झाली. डॉ. अजित नवले यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी वेळोवेळी आंदोलने केली आहे. यात दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन गाजले होते. शिवाय नवले यांनी किसान सभेच्या वतीने नाशिक ते मुंबई असा शेतकरी लाँग मार्च काढला होता. या लॉंग मार्चची देशभरात चर्चा झाली होती.
यावेळी पक्षाचे पॉलिट ब्युरो सदस्य व समन्वयक प्रकाश कारत, पॉलिट ब्युरो सदस्य निलोत्पल बसू आणि डॉ. अशोक ढवळे हे उपस्थित होते. राज्यातील २९ जिल्ह्यांतील एकूण ३३७ प्रतिनिधी उपस्थित होते.
अधिवेशनात बोलताना प्रकाश कारत यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या रूपात आंतरराष्ट्रीय स्तरावर अतिउजव्या साम्राज्यवादी शक्तींचा उदय, जगावर आणि भारतावर त्याचा परिणाम, पॅलेस्टाईनविरुद्धचे नरसंहारक युद्ध, जागतिक स्तरावर उजव्या विचारसरणीच्या शक्तींची एकजूट यांचे त्यांनी विश्लेषण केले. त्याच वेळी त्यांनी लॅटिन अमेरिका आणि श्रीलंकेत समाजवादी व डाव्या विचारसरणीच्या शक्तींनी केलेल्या तीव्र प्रतिकाराची आणि मिळवलेल्या विजयांची प्रकर्षाने मांडणी केली. कारत यांनी मोदींच्या नेतृत्वाखालील आरएसएस-भाजप राजवट नवफॅसिस्ट, सांप्रदायिक, मनुवादी आणि कॉर्पोरेटसमर्थक असल्याचे सांगितले. देशात सीपीआय(एम) ने चालवलेल्या संघर्षांचा संदर्भ देत त्यांनी त्यात मोठ्या प्रमाणात वाढ करण्याचे आवाहन केले. शेवटी, त्यांनी सीपीआय(एम) आणि डाव्या शक्तींना त्यांची स्वतंत्र ताकद अनेक पटीने वाढवण्याचे आवाहन केले, तसेच आरएसएस-भाजपला पराभूत करण्यासाठी सर्व धर्मनिरपेक्ष शक्तींची एकजूट निर्माण करण्याचे आवाहन केले.
संबंधित बातम्या