Mumbai Double Decker Bus : डबल डेकर बस आली की असंख्य प्रवासी वरच्या मजल्यावर जागा पडकण्यासाठी घाई करायचे. परंतु आता मुंबईतील हे चित्र कायमचंच बदलणार आहे. मायानगरी मुंबईचं दर्शन देणारी डबल डेकर बस कायमची इतिहासजमा झाली आहे. मुंबईकरांनी शुक्रवारी डबल डेकर बसच्या शेवटच्या प्रवासाचा आनंद घेतला. यावेळी प्रवासी आणि बेस्टचे कर्मचारी भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. अंधेरी पूर्व रेल्वे स्थानक ते सीप्झ मार्गावरील डबल डेकर बसला अखेरचा निरोप देण्यात आला आहे. यावेळी प्रवासी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आवडती बस बंद होत असल्याने अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.
मुंबईतील अखेरची डबल डेकर बस अंधेरी रेल्वे स्थानक ते सीप्झ मार्गावर धावली. या बसमधून प्रवास करण्यासाठी मोठ्या संख्येने प्रवाशांनी गर्दी केली होती. चार वाजेपासूनच लोकांनी रांगा लावत या बसच्या प्रवासासाठी तिकीट खरेदी करण्यास सुरुवात केली होती. बेस्टच्या अधिकाऱ्यांनी फुलं, हारतुरे आणि फुग्यांनी डबल डेकर बसला सजवलं होतं. अनेकांनी आपल्या मुलाबाळांनाही बसला निरोप देण्यासाठी आणलं होतं. अंधेरीहून नटराज स्टुडिओ, चकाला मार्गे सीप्झपर्यंत जाताना लोकांनी व्हिडिओ, रिल्स आणि फोटोशूट करण्यास पसंती दिली. अखेरची बस धावत असल्याने अनेकांनी दुकानांच्या बाहेर येत अखेरचं दर्शन घेत आठवणी जागवल्या.
बस धावत असताना अनेक प्रवासी अधूनमधून घोषणाबाजी करत होते. उत्साह वाढत असतानाच बस सीप्झमध्ये पोहचली. त्यानंतर प्रवासी, चालक आणि वाहकांनी जड अंत:करणाने डबल डेकर बसला अखेरचा निरोप दिला. कुर्ला, अंधेरी, दादर किंवा शहरातील अन्य ठिकाणी प्रवास करताना प्रवाशांना मुंबई वेगळ्या पद्धतीने पाहण्याचा आनंद मिळत होता. परंतु आता मुंबईचं दर्शन घडवणारी डबल डेकर बस बंद झाल्याने मुंबईकरांचे डोळे पाणावल्याचं पाहायला मिळालं.