ट्रोलिंगची फिकीर मी करत नाही; बोललो की विषय संपला! कोणासमोर असं बोलले राज ठाकरे?
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  ट्रोलिंगची फिकीर मी करत नाही; बोललो की विषय संपला! कोणासमोर असं बोलले राज ठाकरे?

ट्रोलिंगची फिकीर मी करत नाही; बोललो की विषय संपला! कोणासमोर असं बोलले राज ठाकरे?

Published Oct 07, 2024 02:11 PM IST

Raj Thackeray : चुकीच्या गोष्टींबद्दल बोला आणि बोलताना ट्रोलिंगचा विचार करू नका, असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी साहित्यिकांना केलं आहे.

ट्रोलिंगची फिकीर मी करत नाही; बोललो की विषय संपला! कोणासमोर असं बोलले राज ठाकरे?
ट्रोलिंगची फिकीर मी करत नाही; बोललो की विषय संपला! कोणासमोर असं बोलले राज ठाकरे?

Raj Thackeray on Trolling : ‘आजवर मी अनेक भाषणं केली, मुलाखती दिल्या. पण कधीही ट्रोलिंगचा विचार करत नाही. माझ्या वक्तव्यावर सोशल मीडिया काय बोलतं हे कधीच पाहिलं नाही. मला कुणाला स्पष्टीकरण द्यायची गरज वाटत नाही,’ असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज म्हणाले.

राजधानी दिल्लीत लवकरच होऊ घातलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचं अनावरण आज करण्यात आलं. या कार्यक्रमाला राज ठाकरे उपस्थित होते. त्यावेळी केलेल्या छोटेखानी भाषणात त्यांनी महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय भाषेविषयी चिंता व्यक्त केली. तसंच, साहित्यिकांकडून ठोस भूमिकेची अपेक्षा व्यक्त केली.

'महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर सध्या कमालीचा खाली गेलाय. अत्यंत वाईट भाषा बोललीय जातेय. त्याला प्रसिद्धी दिली जातेय. महाराष्ट्राची अक्षरश: सर्कस झालीय. कोणी विदुषकी चाळे करतंय. कोणी मंत्रालयातल्या जाळ्यांवर उड्या मारतंय. हे सगळं करणाऱ्यांना आणि चुकीचं बोलणाऱ्यांना समजावणारंही कोणी नाही. ती जबाबदारी साहित्यिकांनी घ्यायला हवी, असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज केलं.

साहित्यिकांमध्ये ती धमक दिसत नाही!

गेली अनेक वर्षे मी महाराष्ट्रातील साहित्यिकांना पाहत आलोय. प्रत्येकाच्या अंगात मराठी बाणा रुजलेला असायचा. बिघडलेल्या गोष्टींबद्दल बोलण्याची, योग्य वेळी राजकारण्यांना ठणकावून सांगण्याची धमक, हिंमत जी काही वर्षांपूर्वी होती, ती आज कुठंतरी कमी दिसतेय, असं राज ठाकरे यावेळी साहित्यिकांसमोरच म्हणालो. ज्या प्रकारची भाषा वापरली जातेय. ज्या गोष्टी केल्या जातायत. तिथं कान धरून त्यांना ठणकावून सांगणं, त्यांना शिकवणं, समजावून सांगणं हा साहित्यिकांचा अधिकार आहे, असं राज ठाकरे म्हणाले.

साहित्यिकांनी ट्रोलिंगचा विचार करू नये!

योग्य गोष्टी बोलताना साहित्यिकांनी ट्रोलची भीती बाळगण्याची गरज नाही. मी आजपर्यंत जे बोललोय. अनेक भाषणं, मुलाखती दिल्यात, त्यावर सोशल मीडियावर काय येतंय हे मी कधी वाचत नाही. त्या भानगडीतच पडत नाही. माझं बोलून झालंय ना विषय संपला, असं राज म्हणाले.

मी कुठल्या गोष्टीचं स्पष्टीकरण करायला जात नाही, हे सांगताना राज ठाकरे यांनी अब्राहम लिंकन यांचं वाक्य सांगितलं. 'कधीही स्पष्टीकरण द्यायला जाऊ नका. कारण, जे प्रेम करतात ते स्पष्टीकरण मागत नाहीत आणि जे द्वेष करतात त्यांच्याकडं स्पष्टीकरून उपयोग नाही, असं राज म्हणाले.

'महाराष्ट्र देशाला दिशा देणारा आहे. त्या महाराष्ट्रात राजकीय भाषा खालच्या थराला गेलीय. हे सगळं बघून नव्या पिढीला राजकारणात यायची इच्छा होणार नाही. चुकीच्या गोष्टींबद्दल समजावणारं कोणी नाही. ज्यांना बुजुर्ग म्हणावं, तेच त्यांच्या आहारी गेले आहेत. त्यामुळं ही जबाबदारी साहित्यिकांनी घ्यायला हवी. मला ते खूप गरजेचं आणि महत्त्वाचं वाटतं, असं राज म्हणाले.

महाराष्ट्राचं अध:पतन होण्याचं (अप)श्रेय चॅनेलवाल्यांचं

इलेक्ट्रॉनिक चॅनेलवाल्यांवर राज ठाकरे यांनी यावेळी टीका केली. चॅनेलवाले प्रत्येक गोष्ट दाखवतात म्हणून बोलणारे काहीही बोलतात. महाराष्ट्राचं अध:पतन होण्याचं (अप)श्रेय चॅनेलवाल्यांना जातं, असं राज ठाकरे म्हणाले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर