Pune Crime News Marathi : मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये रामनवमी उत्साहात साजरी करण्यात आली आहे. परंतु रामनवमीचा उत्सव सुरू असतानाच पुण्यातील सोमवार पेठेतील साईबाबा मंदिरातून चोरट्यांनी दानपेटी लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोमवार पेठेतील नरपतगिरी चौकातील साईबाबा मंदिरात ही घटना घडली असून त्यानंतर आता या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. दिलीप बहिरट यांनी या प्रकरणाची समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दानपेटीत किती रक्कम होती, हे अद्याप कळू शकलेलं नाही, परंतु चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी परिसरातली सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यास सुरुवात केल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील सोमवार पेठेत श्री साई सेवा प्रतिष्ठानचे साईबाबा मंदिर आहे. रामनवमीनिमित्त शहरात उत्सवांचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यामुळं अनेक भाविक उत्सवांमध्ये सहभागी झाले. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी साईबाबा मंदिराचं कुलूप तोडून दानपेटी लंपास केली. त्यानंतर मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांना या मंदिरातील दानपेटी गायब असल्याचं लक्षात आलं. याशिवाय मंदिराचं कुलूप तुटलेल्या अवस्थेत असल्याचं समजताच भाविकांनी तातडीनं या प्रकरणाची माहिती समर्थ पोलिसांना दिली. त्यानंतर आता पोलिसांनी अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
साईबाबा मंदिरातील दानपेटीत लाखोंची रोख रक्कम असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. याशिवाय चोरट्यांनी मध्यरात्री ही चोरी केल्यामुळं हे प्रकार कुणाच्याही लक्षात आला नाही. त्यानंतर आता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पोलिसांनी साईबाबा मंदिर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं चित्रीकरण ताब्यात घेतलं आहे. याशिवाय परिसरातील अनेक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास समर्थ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे हे करत आहेत.
संबंधित बातम्या