Dombivli Blast News : डोंबिवली पूर्वेतील एमआयडीसीमधील अमुदान केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट (Dombivli MIDC Blast) झाला. हा स्फोट इतका भीषण होता की,डोंबिवली व आजूबाजूच्या परिसराला भूकंपासारखे हादरे बसले. हवेत धुराचे लोळ लांबवरून दिसत होते. ३ ते ४ किलोमीटर परिसरातील रहिवाशी इमारतीच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. तसेच बॉयलरच्या स्फोटाचा आवाज ४ किलोमीटरच्या परिसरात ऐकू आला. या कंपनीच्या जवळ असलेले हुदांई गाड्यांचे शोरूम जळाले आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्याअसून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान मंत्री उदय सामंत यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला असून ४० जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये २ महिलांचा समावेश आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची दखल घेत प्रशासनाला नियंत्रण मिळवण्याचे आदेश दिले आहेत.
डोंबिवली पूर्वच्या सोनारपाडा परिसरातील मेट्रो केमिकल कंपनीजवळ असलेल्या अंबर केमिकल कंपनीत ही आग लागल्याचे समोर आले आहे. या आगीत आतापर्यंत दोन महिलांसह चार जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ३० ते ४० नागरिक जखमी झाले असून त्यांच्यावर नजीकच्या विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या आगीमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.
घटनास्थळी स्फोटामुळे अनेक वाहनांचे आणि अनेक घरांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. या कंपनीच्या जवळ असलेल्या हुंदाईच्या शोरूमला आग लागली व या आगीत संपूर्ण शोरूम जळून खाक झाले.
डोंबिवली आगीच्या घटनेसंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट झाल्याची घटना दु:खद आहे. ८ जण या घटनेत अडकले होते. त्यांना बाहेर काढण्यात आले आहे. जखमींच्या उपचाराची व्यवस्था करण्यात आली असून आणखी रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. एनडीआरएफ, टीडीआरएफ, अग्नीशमन दलाच्या चमू पाचारण करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना त्यांनी केली.
कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम, पलावा एमआयडीसी आणि ठाणे अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले असून, आग आटोक्यात आणण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
संबंधित बातम्या