मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  नातवाला भेटायला आलेल्या वृद्ध महिलेसह मुलाला सुनेच्या कुटुंबीयांकडून कपडे फाटेपर्यंत मारहाण, डोंबिवलीतील घटना

नातवाला भेटायला आलेल्या वृद्ध महिलेसह मुलाला सुनेच्या कुटुंबीयांकडून कपडे फाटेपर्यंत मारहाण, डोंबिवलीतील घटना

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 27, 2024 07:13 PM IST

Dombivali Crime : घटस्फोटाची प्रक्रिया सुरू असताना एक पती आपल्या आईला घेऊन पत्नीच्या माहेरी मुलांना भेटण्यासाठी आला होता. त्यावेळी पत्नीच्या नातेवाईकांनी या मायलेकांना बेदम मारहाण केली.

Dombivali crime
Dombivali crime

डोंबिवलीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या नातवाला भेटायला सूनेच्या माहेरी गेलेल्या वृद्ध महिलेला सुनेच्या कुटूंबीयांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. वृद्ध महिलेला सुनेच्या माहेरच्या लोकांनी कपडे फाडत अर्धनग्न करत बेदम मारहाण केली. ही घटना डोंबिवली खंबाळ पाडा भोईरवाडी परिसरात घडली. 

या मारहाणीत महिला जखमी झाली असून त्यांच्यावर डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी टिळक नगर पोलीस ठाण्यात नोंद झाली असून. सुनेच्या माहेरच्या महिलांसह पुरुषांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार भोईरवाडी परिसरात राहणाऱ्या अजय कुशवाहा यांचा पत्नीसोबत वाद सुरू आहे. कुशवाहा यांची पत्नी आपल्या मुली आणि मुलासोबत माहेरी राहते. दोघांमध्ये घटस्फोटाची प्रक्रिया सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी अजय आपल्या आईला घेऊन मुली आणि मुलाला भेटण्यासाठी आपल्या सासरवाडीत गेला होता. त्याठिकाणी आधी त्याला आपल्या मुली आणि मुलाला भेटू दिले नाही.

अजय यांच्या पत्नीच्या भावाने काही मित्रांना बोलावून अजयला बेदम मारहाण केली. मुलाला वाचवायला गेलेल्या त्याच्या आईलाही बेदम मारहाण केली. सूनेच्या आईने व अन्य महिलांनी अजयच्या आईला मारहाण केली. या मारहाणीत अजयच्या आईचे कपडे फाटले तरीही तिला मारहाण केली. या प्रकरणात डोंबिवलीतील टिळक नगर पोलिसांनी गणेश सिंग, अरविंद सिंग , नयना देवी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

WhatsApp channel