General Knowledge : जळगाव हा जिल्हा महाराष्ट्रातील एक महत्वाच्या जिल्ह्यांपैकी एक आहे.आज देशात जळगावचे नाव कापूस, केळी आणि शुद्ध सोने यासाठी प्रसिद्ध आहे. परंतु, जळगाव केवळ यासाठीच नव्हेतर अनेक अशा गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे, ज्याची बहुतेक कमी लोकांना माहिती आहे.
कापूस, केळी व सोने यासाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव जिल्ह्याला अनेक ऐतिहासिक संदर्भ आहेत. रामायण आणि महाभारतकाळातील घटना आणि घडामोडी जळगाव जिल्ह्याशी संबधित आढळून आलेल्या आहेत. श्री क्षेत्र पद्मालय येथे भीमाने बकासूराचा वध केला होता. तर, प्रभु रामाने बाण मारून उनपदेव व सुनपदेव हे गरम पाण्याचे झरे निर्माण केले. अबुल फजल ज्याला अदिलाबाद म्हणतो ते एदलाबाद ( आताचे मुक्ताईनगर) हे चांगले नगर होते. राजा दशरथाने श्रावण बाळाची हत्या करून जे महापातक केले होते. त्याचे परिमार्जन दशरथाने एदलाबादजवळील पवित्र तलावात केले.
अठराव्या शतकात ब्रिटिश सैन्याने खानदेशला मुख्यालय म्हणून ताब्यात घेतले. त्यावेळी रोबर्ट गिल हे खानदेश जिल्ह्यातील ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे पहिले अधिकारी होते. १९०६ मध्ये जेव्हा खानदेशाचे विभाजन झाले, तेव्हा पूर्व खानदेश सध्याचे जळगाव बनले. त्यानंतर १९६० मध्ये महाराष्ट्राच्या निर्मितीसह जळगाव हा राज्याचा जिल्हा बनला. दरम्यान, जळगाव केवळ त्याच्या इतिहास आणि सांस्कृतिक वारसाबद्दलच नाही तर त्याच्या केळी उत्पादनासाठी देशभर प्रसिद्ध आहे. जळगाव जिल्ह्यात केळीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन केले जाते आणि येथील केळी गुणवत्ता आणि चवसाठी ओळखल्या जातात. सोबतच देशात शुद्ध सोन्यासाठी जळगावची बाजारपेठ प्रसिद्ध आहे.
जळगावला १९६० पूर्वी खानदेश म्हणून ओळखले जात होते. खानदेश हे नाव गुजरातच्या अहमद ने फारुकी राजांच्या दुसऱ्या मलिक नासीरला दिलेल्या खान उपाधीवर आले. काही तज्ज्ञांच्या मते, हे नाव महाभारताच्या खांडव जंगलातून आले. सप्तवनानस, आंध्रभृत्यस, विरसेन (अहिर राजा), यवन राजवंश, चालुक्य, यादव आणि नंतर अलाउद्दीन खिलजी, मोहम्मद तुघलक, मलिक राजा मलिक नजीर, हैदराबादचा निजाम आणि त्यानंतर मराठ्यांनी या प्रदेशावर राज्य केले.
पारोळा तहसीलमध्ये झांसीच्या महान राणीच्या वडिलांचे मानले जाणारे किल्ल्याचे अवशेष आहेत. १९३६ चे अखिल भारतीय काँग्रेस अधिवेशन यावल तहसीलच्या फैजपूर येथे आयोजित करण्यात आले. सध्याच्या काळात जळगावच्या प्रसिद्ध कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी अहिराणी बोलीची ख्याती सात समुद्रात पसरवली.
संबंधित बातम्या