Medha Kulkarni slams amol mitkari : ‘ज्या ज्या वेळेला आपल्या शेपटीवर कोणी पाय देईल, तेव्हा सोडायचं नाही. योग्य असेल तर ऐकून घेणं आपलं काम आहे. सगळ्यांचं काम आहे. चुका झाल्या असतील तर दुरुस्तही केल्या पाहिजेत. पण चुकलं नसेल तर तिथं प्रतिक्रिया दिलीच पाहिजे,’ असं आवाहन भाजपच्या राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी केलं.
सांगलीतील ब्राह्मण समाजाच्या एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कुलकर्णी यांच्या हस्ते यावेळी ब्राह्मण समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. ‘एखाद्या गावात तुमच्यावर अन्याय होत असेल तर तुम्ही धाडसानं उभं ठाकलं पाहिजे. तर आम्हालाही त्यात काही करता येईल. जेव्हा गरज पडेल तेव्हा मला फोन करा,’ असं कुलकर्णी म्हणाल्या.
समाजाबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवल्या जात असतील तर विरोध करायलाच हवा, असं सांगताना त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांचं उदाहरण दिलं. निवडणुकीच्या काळात एका सभेसाठी मला आमंत्रण देण्यात आलं होतं. मात्र त्या कार्यक्रमात अमोल मिटकरी येणार होते. त्यामुळं मी तिथं जाण्यास नकार दिला. आमच्या पुरोहितांची, आपल्या मंत्रांची चेष्टा करणाऱ्या माणसासोबत मी स्टेजवर जाणार नाही असं मी आयोजकांना ठामपणे सांगितलं. पण माझं तिथं जाणं त्यांच्यासाठी महत्त्वाचं होतं. त्यामुळं त्यांनी मिटकरी यांना नंतर यायला सांगितलं. शेवटी मिटकरी त्या कार्यक्रमाला गेलेच नाहीत, अशी आठवण कुलकर्णी यांनी सांगितली. आपण मर्यादा सोडून बोलतोय हे कुठंतरी त्यांनाही कळलं पाहिजे. कुठंतरी चाप लागला पाहिजे, अन्यथा बदल होणार नाही, असंही त्या म्हणाल्या.
आपण तीन टक्के आहोत की साडेतीन टक्के यात जायचं नाही. स्वत:च्या कर्तृत्वानं पुढं जायचं आहे. जिथं कुठं जे कोणी वंचित असतील त्यांना मदत करायची, मग ते कोणत्याही समाजाचे असोत,’ असं कुलकर्णी म्हणाल्या. 'आपण बाजीराव पेशव्यांचे वंशज आहोत. माझ्या अंगात पेशव्यांचं रक्त सळसळतंय. टिळकांचं रक्त सळसळतंय. सावरकरांचं रक्त सळसळतंय याची जाणीव मला कायम असते, असंही मेधा कुलकर्णी यावेळी म्हणाल्या.
आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावरही कुलकर्णी यांनी यावेळी टीका केली. त्यांनी आव्हाड यांचा ’जितूद्दीन' असा उल्लेख केला. ‘देशातील सर्व हिंदूंना एकत्र करायचं आहे. देशाला पुढं नेण्यासाठीच्या कामासाठी एकटे नरेंद्र मोदी किंवा फडणवीस पुरणार नाहीत. सर्वांनी देशासाठी काम करायला पाहिजे. प्रश्न समजून घेऊन देशाला पुढं नेऊया, असं आवाहनही कुलकर्णी यांनी यावेळी केलं.