मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Bhushan : ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराचे मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते गुरुवारी वितरण

Maharashtra Bhushan : ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराचे मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते गुरुवारी वितरण

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Feb 21, 2024 08:56 PM IST

Maharashtra Bhushan Award : मराराष्ट्र सरकारकडून दिला जाणारा राज्यातील सर्वोच्च नागरी सन्मान महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना गुरुवारी प्रदान केला जाणार आहे.

Maharashtra Bhushan Award
Maharashtra Bhushan Award

महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान असणारा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार, उद्या (गुरुवार) ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. तर मानाचा “गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार” ज्येष्ठ पार्श्वगायक सुरेश वाडकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. 

त्याचबरोबर याशिवाय, मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीसाठी आपल्या कलेच्या माध्यमातून अनेक वर्ष योगदान देत रसिकांची व कलासृष्टीची सेवा करणाऱ्या ज्येष्ठ कलावंतांना दिला जाणारा राजकपूर जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कार,  चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कारही यावेळी प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

वरळी येथील डोम, एनएससीआय ( नॅशनल स्पोर्टस क्लब ऑफ इंडिया) येथे गुरुवारी सायंकाळी ६.३० वाजता होणाऱ्या ५७ व्या राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात हे पुरस्कार  मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात करण्यात येतील. या समारंभास केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. 

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना २०२३ साठीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. राजकपूर जीवनगौरव पुरस्कार सन २०२० साठी ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती अरुणा इराणी, सन २०२१ साठी ज्येष्ठ अभिनेते  मिथुन चक्रवर्ती आणि सन २०२२ साठी ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती हेलन यांना जाहीर झाला आहे तर राजकपूर विशेष योगदान पुरस्कार सन २०२० साठी ज्येष्ठ दिग्दर्शक  जे. पी. दत्ता, सन २०२१ साठी ख्यातनाम गायक  सोनू निगम आणि सन २०२२ साठी विधू विनोद चोप्रा यांना जाहीर झाला आहे. या समारंभात त्यांना सन्मानपूर्वक हे पुरस्कार प्रदान केले जातील.

ज्येष्ठ कलावंतांना दिला जाणारा चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार सन २०२० साठी ख्यातनाम चित्रपट अभिनेते रविंद्र महाजनी (मरणोत्तर), सन २०२१ साठी ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती उषा चव्हाण आणि सन २०२२ साठी ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती उषा नाईक यांना जाहीर झाला आहे. यासोबतच चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार सन २०२० साठी चित्रपट दिग्दर्शक गजेंद्र अहिरे, सन २०२१ साठी ज्येष्ठ पार्श्वगायक  रवींद्र साठे  आणि सन २०२२ साठी प्रसिद्ध चित्रपट अभिनेते-दिग्दर्शक  नागराज मंजुळे यांना जाहीर झाला आहे. या राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याच्या समारंभात हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.

WhatsApp channel