कल्याणमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शहरातील बिर्ला कॉलेजमध्ये शिकणाऱ्या कॉलेजच्या दोन तरुणांमध्ये मुलीवरून जोरदार वाद झाला. या वादातून कॉलेज तरुणाने चक्क थार गाडी दुसऱ्या तरुणाच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने यात कुठलीही मोठी दुर्घटना घडली नाही. मात्र या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे थार अंगावर घालणारा तरुण परप्रांतीय असल्याचे सांगितले जात आहे. परप्रांतीयांच्या दादागिरीच्या घटना एकामागे एक बाहेर येत असतानाच पुन्हा एक घटना घडल्याने मराठी-परप्रांतीय वाद पुन्हा चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
श्लोक सावंत असं या पीडित विद्यार्थ्याचं नाव असून सुयश तिवारी असं हल्ला करणाऱ्या आरोपीचं नाव आहे. या प्रकारामुळे शहरात खळबळ माजली आहे. दोन तरुणांमध्ये झालेल्या वादाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन कारवाई सुरू केली आहे. पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. कल्याण पूर्वेमध्ये ही घटना घडली.
येथे एका परप्रांतीय तरुणाने मराठी विद्यार्थ्याच्या अंगावर थार गाडी घालून त्याला चिरडण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न फसल्यावर त्याच्या अपहरणाचाही प्रयत्न केला. मात्र स्थानिक नागरिकांनी वेळीच धाव घेतल्यानं त्याचा हा प्रयत्न फसला. ही घटना तेथे असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
या प्रकरणी कोळशेवाडी पोलिसांकडून तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पीडित मुलाच्या आईने म्हटलं की, आम्ही मराठी लोक महाराष्ट्रातच सुरक्षित नाही तर कसे होणार? असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे. दरम्यान सध्या हा वाद नेमका कशाचा आहे? याचा तपास कल्याण कोळशेवाडी पोलीस करत आहेत.
दरम्यान घटनेतील सुयश जयेश तिवारी आणि श्लोक सागर सावंत हे दोघेही कल्याण पश्चिमेतील बिर्ला कॉलेजमध्ये एकत्र शिक्षण घेत आहेत. या प्रकरणात दोन्हीकडून तक्रार दाखल केली नाही. या घटनेबाबत कल्याण कोळशेवाडी पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल करून घटनेचा तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही तक्रारदार तक्रार देत नसून जबाब नोंदवून घेतला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी दिली आहे. दरम्यान मुलीवरून दोघात वाद झाल्याचे सांगितले जात आहे.
संबंधित बातम्या