आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा विदर्भ दौरा सुरू आहे. त्याआधी राज ठाकरे मराठावाड्याच्या दौऱ्यावर होते. दरम्यान, आज चंद्रपूर दौऱ्यात मनसेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. राज ठाकरेंच्या बैठकीतून बाहेर पडताच मनसेच्या दोन गटात राडा झाला आहे. राजुरा विधानसभा मतदारसंघात सचिन भोयर यांच्या उमेदवारीला विरोध करत भोयर समर्थक आणि दुसरे इच्छुक चंद्रप्रकाश बोरकर समर्थकांमध्ये हा जोरदार राडा झाला आहे.
मनसेच्या चंद्रपूर जिल्ह्याच्या बैठकीत राज ठाकरे यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील २ विधानसभा मतदारसंघात उमेदवारांची घोषणा केली. उमेदवारी घोषित केल्यानंतर संधी न मिळाल्याने नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे बैठकीतून बाहेर पडताच सभेच्या ठिकाणी गोंधळ घालत खुर्च्यां एकमेकांवर फेकून तोडफोड केली.
या राड्याची राज ठाकरे यांनी दखल घेतली असून या सगळ्या प्रकारानंतर राज ठाकरे यांनी गोंधळ घालणाऱ्या चंद्रप्रकाश बोरकर यांना पक्षातून निष्कासित केलं आहे. पक्षात अशी बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही. असे वागणाऱ्यांवर अशाच पद्धतीने कारवाई होईल, असे पक्षाचे सरचिटणीस राजू उंबरकर यांनी सांगितलं.
राज ठाकरे २६ ऑगस्टपर्यंत विदर्भ दौऱ्यावर असणार आहेत. राज ठाकरे यांचा आज चंद्रपुरात पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली. बैठकीनंतर पुढच्या दौऱ्यासाठी निघताच सभागृहातच मनसेच्या दोन गटात तुफान राडा झाला. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना हाणामारी केली. ही हाणामारीची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
विधानसभेसाठी मनसेकडून तयारी सुरू करण्यात आली असून आत्तापर्यंत एकूण ६ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. उमेदवारांची घोषणा केल्याने मनसेची विधानसभेला एकला चलो रे भूमिका असल्याचे समोर आले आहे.
आज चंद्रपूर येथील मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राज ठाकरे यांनी चंद्रपूर व राजुरा विधानसभा मतदारसंघांसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. राज ठाकरे यांनी चंद्रपूर विधानसभेसाठी मनदीप रोडे आणि राजुरा विधानसभा मतदारसंघासाठी सचिन भोयर यांच्या नावाची घोषणा केली आहे. राज ठाकरे मराठावाडा दौऱ्यावर असताना त्यांनी ४ उमेदवारांची घोषणा केली होती. त्यानंतर, विदर्भ दौऱ्यात २उमेदवारांची घोषणा झाल्याने आता एकूण जाहीर उमेदवारांची संख्या ६ झाली आहे.
1.शिवडी विधानसभा मतदारसंघ - बाळा नांदगावकर (मुंबई)
2.पंढरपूर विधानसभा मतदारसंघ -दिलीप धोत्रे
3. लातूर ग्रामीण मतदारसंघ - संतोष नागरगोजे
4.हिंगोली विधानसभा मतदारसंघ - बंडू कुटे
5.चंद्रपूर विधानसभा मतदारसंघ - मनदीप रोडे
6.राजुरा विधानसभा मतदारसंघ - सचिन भोयर