मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  पिल्लाला जन्म देणार्‍या सापसुरळीच्या ५ प्रजातींचा शोध, उद्धव ठाकरेंचा मुलगा तेजस ठाकरेंचं संशोधन

पिल्लाला जन्म देणार्‍या सापसुरळीच्या ५ प्रजातींचा शोध, उद्धव ठाकरेंचा मुलगा तेजस ठाकरेंचं संशोधन

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Jan 20, 2024 04:56 PM IST

Skink Research: पिल्लाला जन्म देणार्‍या सापसुरळीच्या नव्या कुळाचा शोध लागला आहे.

Skink
Skink

Thackeray Wildlife Foundation: पिल्लाला जन्म देणार्‍या सापसुरळीच्या नव्या कुळाचा आणि ५ नवीन प्रजातींचा शोध लावण्यात 'ठाकरे वाईल्डलाईफ फाउंडेशन'च्या संशोधकांना यश आले. महत्त्वाचे म्हणजे, पिल्लाला जन्म देणार्‍या सापसुरळीची ही पहिलीच नोंद आहे. जर्मनीमधून प्रकाशीत होणार्‍या 'व्हर्टिब्रेट्स झूलॉजी' या अंतरराष्ट्रीय वैज्ञानिक नियतकालिकातून या संशोधनावरती शिक्कामोर्तब झाले. या संशोधनामधे ठाकरे वाईल्डलाईफ फाउंडेशनचे संशोधक ईशान अगरवाल, तेजस ठाकरे आणि अक्षय खांडेकर यांचा सहभाग आहे.

नव्याने शोधलेल्या कुळाला 'द्रविडोसेप्स' असे नाव देण्यात आले. 'द्रविड' या संस्कृत आणि 'सेप्स' या ग्रीक शब्दांवरुन हे नामकरण केले आहे. दक्षिण भारतातील आढळक्षेत्रासाठी 'द्रविड' आणि सापसदृश्य ठेवणीसाठी 'सेप्स' यांच्या जोडणीतून कुळाचे नाव योजिले आहे. अंड्यांऐवजी पिल्लांना जन्म देणे, डोळ्यांवरील खालच्या पापणीचे पारदर्शक असणे आणि जनुकीय संच्याच्या वेगळेपणावरुन द्रविडोसेप्स हे कुळ सबडोल्युसेप्स या कुळापासून वेगळे केले. नव्याने शोधलेल्या पाचही प्रजाती या तामिळनाडू राज्यातील आहेत.

द्रविडोसेप्स गोवाएन्सीस प्रजात महाराष्ट्रात कुठे आढळते?

द्रविडोसेप्स जिंजीएन्सीस, द्रविडोसेप्स जवाधूएन्सीस, द्रविडोसेप्स कलक्कडएन्सीस, द्रविडोसेप्स श्रीविल्लीपुथुरेन्सीस आणि द्रविडोसेप्स तामिळनाडूएन्सीस या पाचही प्रजातींचे नामकरण त्यांच्या आढळक्षेत्रावरुन देण्यात आले. नव्या कुळात समाविष्ट केलेली द्रविडोसेप्स गोवाएन्सीस ही प्रजात उत्तर गोव्यातील उत्सुम तसेच महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग (अंबोली) आणि कोल्हापूर जिल्ह्यातून नोंदवली गेली आहे. कोल्हापूर जिल्हातील तिचा आढळ राधानगरी, पंडिवरे (भुदरगड), तळये (गगनबावडा) आणि वाशी (पन्हाळा) या ठिकाणांवरुन नोंदवला गेला.


भारतामधे सापसुरळ्यांच्या चाळीसहून अधिक प्रजातींची नोंद

भारतामधे सापसुरळ्यांच्या चाळीसहून अधिक प्रजातींची नोंद आहे. यातील भारतीय द्वीपकल्पासाठी पिल्लाला जन्म देणार्‍या सापसुरळीची ही पहीलीच नोंद आहे. सरीसृपांमधे पिल्लांना जन्म देण्याचे समयोजन हे कमी तापमानाच्या अधिवासाशी जोडलेले आहे. कमी तापमानामधे अंडी उबवण्याच्या अडचणींवरील उपाय म्हणून थेट पिल्लांनाच जन्म देण्याचे समयोजन उत्क्रांत झाले असावे असा मतप्रवाह आहे.

WhatsApp channel