राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना दोन वर्षांची मुदतवाढ देण्यात आली असून त्या जानेवारी २०२६ पर्यंत महासंचालक पदावर कायम राहणार आहेत. फोन टॅपिंग प्रकरणात न्यायालयातून दिलासा मिळाल्यानंतर रश्मी शुक्ला यांची पोलीस महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आली होती. रश्मी शुक्ला या जून २०२४ मध्ये सेवानिवृत्त होणार होत्या. सध्या त्यांचा चार महिन्यांचा कार्यकाळ शिल्लक आहे. मात्र, याआधीच रश्मी शुक्ला यांना दोन वर्षांचा कार्यकाळ वाढवून देण्यात आला आहे.
रश्मी शुक्ला यांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. अखेर त्यांना दोन वर्षाचा कार्यकाळ वाढवून देण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने यासंदर्भात नोटिफिकेशन काढून माहिती दिली आहे.
रश्मी शुल्का या राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक आहेत. फोन टॅपिंगचे आरोप झाल्यानंतर त्या चर्चेत आल्या होत्या. यावरुन विरोधकांकडून त्यांच्यावर वारंवार टीका होत असते.
त्यांना मुदतवाढ दिल्यानंतर विरोधकांनी या निर्णयावर टीका केली आहे. निवडणूक काळात फोन टॅपिंगसाठी भाजप सरकारने हा निर्णय घेतल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी केलीय
मराठा आरक्षण पुरस्कर्ते मनोज जरांगे यांचा बोलविता धनी कोण आहे? हे पहावं लागेल, असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महत्वाच्या भाजप नेत्यांनी केले होते. यावर बोलताना रश्मी शुक्ला पोलीस महासंचालक असताना सरकारसाठी ते शोधणे सोपे आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. जरांगेना कोणी कोणी फोन केले याची माहिती पोलीस महासंचालक फडणवीसांना पुरवू शकतात, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.
संबंधित बातम्या