Dinesh Waghmare Maharashtra Election Commissioner: ज्येष्ठ आयएएस अधिकारी दिनेश वाघमारे यांची राज्याचे नवे निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दिनेश वाघमारे हे सचिव दर्जाचे अधिकारी आहेत. त्यांच्या नावावर राज्यपालांकडून शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. राज्यातील महापालिकांसह आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी नवीन निवडणूक आयुक्तांवर असणार आहे.
मंत्रिमंडळाने राज्य निवडणूक आयोगाच्या नव्या निवडणूक आयुक्तांची निवड करण्याचे सर्वाधिकार मुख्यमंत्र्यांना दिले होते. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी दिनेश वाघमारे यांच्या नावाची शिफारस राज्यपालांकडे केली होती. त्यानुसार राज्यपालांची दिनेश वाघमारेंच्या नावाला मंजुरी मिळाली आहे. त्यानंतर राज्य सरकारच्या वतीने वाघमारेंच्या नियुक्तीचा एक आदेश जाहीर करण्यात आला आहे.राज्य सरकारतर्फे आज सरकारी आदेश काढून त्यांच्या नावाची घोषणा केली. दिनेश वाघमारे हे पुढच्या पाच वर्षांसाठी राज्याचे निवडणूक आयुक्त असतील.
दिनेश वाघमारे हे सचिव दर्जाचे आयएएस अधिकारी आहेत. चे भारतीय प्रशासकीय सेवेतील १९९४ सालच्या बॅचचे अधिकारी असून त्यांनी भारतीय प्रशासकीय सेवेत २९ हून अधिक वर्षांपासून सेवा देत आहेत. त्यांनी राज्य सरकारच्या विविध खात्यातील महत्वाची जबाबदारी सांभाळली आहे.
त्यांनी १९९६ साली पहिल्यांदा रत्नागिरी जिल्ह्याचे सहायक जिल्हाधिकारी जबाबदारी सांभाळली. त्यानंतर पुढे राज्यातील विविध विभागातील महत्वाच्या पदाची जबाबदारी सांभाळली आहे. वित्त, जमीन, उर्जा इत्यादी विभागातील अनेक प्रकल्प त्यांच्या नेतृत्वात पूर्ण केले आहेत.
वाघमारे यांना व्यवस्थापन व प्रशासन क्षेत्रातील २६ वर्षांपेक्षा अधिक अनुभव आहे. त्यांनी बी. ई. (इलेक्ट्रॉनिक्स) विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेतून (व्हीएनआयटी) केले आहे. ते आय.आय.टी. खरगपूरचे एम. टेक. (कॉम्प्युटर सायन्स) इंजिनिअर आहेत. इंग्लंडच्या ब्रॅडफोर्ड विद्यापीठातून त्यांनी विकास आणि प्रकल्प नियोजन या विषयातून एम. एस्सी. केले आहे. त्यांना संघबांधणी, प्रकल्प नेतृत्व, प्रशासन आणि व्यवस्थापन यांचा मोठा अनुभव आहे.
भारतीय राज्य घटनेच्या अनुच्छेद २४३-के व अनुच्छेद २४३-झेडए आणि महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त (अर्हता व नियुक्ती) अधिनियम, १९९४मधील तरतुदीस अनुसरुन महाराष्ट्राचे राज्यपाल, दिनेश टी. वाघमारे यांची,दिनांक २० जानेवारी २०२५ पासून किंवा त्यानंतर ते ज्या तारखेला कार्यालयात आपल्या पदाचा कार्यभार घेतील, त्या तारखेपासून राज्य निवडणूक आयुक्त म्हणून नेमणूक करीत आहेत. दिनेश टी. वाघमारे हे सदर पदाचा कार्यभार स्वीकारतील त्या दिनांकापासून ५ वर्षांकरीता हे पद धारण करतील आणि ते पुनर्नियुक्तीस पात्र असणार नाहीत. त्यांच्या सेवेच्या इतर अटी व शर्ती ह्या राज्य निवडणूक आयुक्त (अर्हता व नियुक्ती) अधिनियम, १९९४ मधील तरतुदीनुसार असतील.
राज्य निवडणूक आयुक्तांवर जिल्हा परिषद, पंचायत समित्या, ग्राम पंचायती, नगरपालिका व महानगरपालिका यांच्या मतदार याद्या तयार करण्याबाबतचे अधिक्षण, संचालन व नियंत्रण करण्याची तसेच त्यांच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी राहील.
संबंधित बातम्या