PM Modi On EVM and Ballot Paper: 'सुशिक्षित देश मतपत्रिकेचा वापर करतात, तर भारतासारखे निरक्षर देश ईव्हीएम वापरतात', असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे विधान पंतप्रधान मोदी यांनी २०१४ पूर्वी केले होते आणि ईव्हीएमपेक्षा मतपत्रिका चांगली होती, असे म्हटले होते, असा दावा केला जात आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदीयांच्या एका क्लिपचा वापर करून त्यांनी ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेचे समर्थन केल्याचे सिद्ध केले आहे. या व्हिडीओमध्ये ते म्हणत आहेत की, 'सुशिक्षित देश अजूनही बॅलेट पेपरचा वापर करतात. पंतप्रधान मोदी ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरने निवडणूक घेण्याच्या बाजूने असल्याचा दावा करण्यासाठी या विधानाचा विपर्यास करण्यात आला. फॅक्ट चेकिंग वेबसाइट बूमने या व्हिडिओचे सत्य उघड केले आहे. हा व्हिडिओ ३ डिसेंबर २०१६ रोजी उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणातील आहे. हे भाषण ते पंतप्रधान झाल्यानंतर झाले होते.
व्हायरल झालेली क्लिप पंतप्रधान मोदींच्या भाषणाच्या संदर्भाबाहेर मांडण्यात आली आहे. आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी भारतातील ईव्हीएमच्या वापराचे कौतुक केले होते. भारताला निरक्षर आणि तांत्रिकदृष्ट्या मागास मानणाऱ्या टीकाकारांवर त्यांनी निशाणा साधला. आपला देश गरीब आहे, लोक निरक्षर आहेत. पण जेव्हा निवडणुका होतात तेव्हा आपण ईव्हीएमचा वापर करतो. त्याचबरोबर अमेरिकेसारखे सुशिक्षित देश आजही मतपत्रिकेवर अवलंबून आहेत, असेही त्यांनी म्हटले.
व्हायरल व्हिडिओचा उद्देश जनतेची दिशाभूल करणे आणि ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करणे हा असल्याचे दिसत आहे. मोदींनी बॅलेट पेपरला प्राधान्य दिल्याचा दावा व्हिडिओमध्ये केला जात आहे, जो पूर्णपणे खोटा आहे. आपल्या भाषणात त्यांनी ईव्हीएम हे तांत्रिक प्रगतीचे उदाहरण आणि भारतीय लोकशाहीच्या यशाचे प्रतीक असल्याचे स्पष्टपणे सांगितले. व्हायरल झालेला व्हिडिओ म्हणजे खोटी माहिती पसरवण्याचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट झाले आहे.