धुळे एमआयडीसीमधील एका कारखान्यात भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा स्फोट सोयाबीन तेल कारखान्यातील टाकीचा झाला आहे. या घटनेत एक जण ठार झाला असून एक जण गंभीररित्या जखमी झाला आहे. कारखान्यात वेल्डिंगचे काम करत असताना गॅस निर्माण होऊन हा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे.
उपेंद्र राजभर (वय २५) असं मृताचे नाव आहे. धुळे एमआयडीसीतील सोयाबीन तेल कंपनीत टाकीवर वेल्डिंगचे काम सुरू होते. त्यावेळी गॅसचा स्फोट झाल्याने टाकीवरून पडून एकाचा मृत्यू झाला तर आणखी एक कामगार गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांनी घटनेची चौकशी सुरू केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार औद्योगिक वसाहतीमधील संजय सोया या कारखान्यात तेलाच्या टाकीवर वेल्डिंगचे काम सुरू असताना स्फोट झाला. ही घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली. वेल्डिंग करताना टाकीमध्ये तयार झालेल्या गॅसचा स्फोट झाल्याने ही दुर्घटना घडली. स्फोट्या हादऱ्याने दोन कामगार टाकीवरून खाली प़डले. यामध्ये उपेंद्र राजभर यांचा जागीच मृत्यू झाला. तर संदीप राजभर हा तरुण गंभीररित्या जखमी झाला असून त्याला हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.
या अपघातात अन्य एक जण किरकोळ जखमी झाला आहे. दरम्यान प्रत्यक्षदर्शी कामगारांनी कंपनीच्या व्यवस्थापनावर गंभीर आरोप केले आहेत. या टाकीमधील गॅसमुळे अपघात होऊ शकतो, त्यामुळे सायंकाळी उशिरा टाकीवर काम करू नये, असे सुचवले असतानाही काही जणांनी काम सुरू ठेवले. यानंतर हा अपघात झाल्याचे कामगारांनी सांगितले. पोलिस घटनेचा तपास करत असून कारखान्यातील कामगार व मालकाकडे चौकशी केली जात आहे.
संबंधित बातम्या