Dhule Crime News : धुळ्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. १४ वर्षीय मुलासोबत दोन जणांनी केलेली मस्करी मुलाच्या जीवावर बेतली आहे. टायरच्या दुकानात काम करणाऱ्या १४ वर्षाच्या मुलाच्या गुदद्वारात कॉम्प्रेसर मशीनने हवा भरल्याने त्याचा मृत्यू झाला. धुळ्यातील लळींग शिवारातील दुचाकी व चारचाकी वाहनांचे पंचर काढण्याच्या दुकानात ही घटना घडली. याप्रकरणी मोहाडी पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धुळ्यातील लळींग शिवारातील सिटी पॉईंट हॉटेलच्या आवारात मोहम्मद मुजाहिद आलम यांचे टायर पंचरचे दुकान आहे. या दुकानात त्यांच्यासोबत त्यांच्या नात्यातील एक १४ वर्षीय मुलगा काम करत होता. त्यांच्या दुकानाच्या बाजुलाच वाहनांचे गॅरेज असून त्या गॅरेजमध्ये रोहित चंद्रवंशी आणि शिवाजी सुळे हे दोघे जण कामाला होते.
दोन्ही दुकाने शेजारी-शेजारीच असल्याने १४ वर्षीय मुलाची त्यांच्यासोबत चांगली ओळख होती. त्यांच्यात नेहमी चेष्टा मस्करी चालत असे. शुक्रवारी नेहमीप्रमाणे दोन्ही दुकाने उघडली. पंचर दुकानाचे मालक मोहम्मद मुजाहिद आलम हे सकाळी १० वाजेच्या सुमारास कामानिमित्त घरी गेले होते. त्यामुळे त्यांच्या दुकानात काम करणारा मुलगा एकटाच होता. यावेळी शिवाजी सुळे व रोहित यांनी त्याची मस्करी करताना त्याच्या गुदद्वारात कॉम्प्रेसर मशीनने हवा भरली.
मुलाच्या पोटात प्रेशरने हवा गेल्याने त्याला त्रास होऊ लागला. त्याचे पोट फुगले. त्यामुळे शिवाजी व रोहित या दोघांनीच त्याला हिरे रुग्णालयात दाखल केले. तेथे मुलाला आयसीयुमध्ये दाखल करून उपचार केले. त्याच्या आतड्यांना व पोटातील नसांना दुखापत झाली होती. डॉक्टरांनी त्याचे ऑपरेशन करावे लागणार असल्याचं सांगितलं. त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करावी लागणार होती, मात्र ऑपरेशनला नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी मोहाडी पोलीस ठाण्यामध्ये संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित बातम्या