धुळे जिल्ह्यात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका तरुणाने सोशल मीडियावर विवाहितेचा फोटो शेअर केला होता. यामुळे जमावाने संबंधित तरुणाला मारहाण केली. यावेळी फोटो शेअर केलेल्या तरुणाने रागाच्या भरात मारहाण करणाऱ्या तरुणाच्या छातीवर चाकूने हल्ला केला. यात तरुणाचा मृत्यू झाला आहे. ही घटना धुळे जिल्ह्यातील हेंद्रुण गावात घडली.
चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे गावात तणावपूर्ण वातावरण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अनिल सूर्यवंशी या तरुणाने गावातील एका विवाहितेचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या प्रकार समोर येताच महिलेचा पती आपल्या दोन भावांसह याचा जाब विचारायला अनिलच्या घरी गेला.
महिलेचा पती व तिच्या दोन दिरांनी अनिल सूर्यवंशीला मारहाण केली. यामुळे चिडलेल्या अनिल सूर्यवंशीने मारहाण करत असलेल्या विवाहितेच्या चुलत दिरावर चाकूने हल्ला केला. यात तो गंभीररित्या जखमी झालेल्या तरुणाला रुग्णालयात केले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
याप्रकरणी मोहाडी पोलिसांत आरोपी अनिल अशोक सूर्यवंशी आणि संतोष अशोक सूर्यवंशी या दोन भावांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर मुख्य आरोपी अनिल सूर्यवंशी फरार असून त्याच्या भावाला अटक केली आहे.