धुळे जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका शेतकऱ्याला बेदम मारहाण करून दोरीने बांधून ठेवले व घरात साठवलेला ३० क्विंटल कापून चोरट्यांनी लांबवला आहे. शेतातच असणाऱ्या घरात हा कापूस साठवून ठेवला होता. सध्या बाजारात कापसाला भाव नसल्याने शेतकऱ्या कापून घरात ठेवला होता व राखणीसाठी थांबला होता. ही घटना शिरूड शिवारातील विंचूर चौफुलीजवळील शेतात घडली आहे.
कापसाची राखण करण्यासाठी शेतात थांबलेल्या शेतकऱ्याला दोरीच्या साहाय्याने बांधून ठेवले व घरातील ३० क्विंटल कापूस चोरून नेला. विजय सोनवणे असे मारहाण करण्यात आलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. ते कापसाची राखण करण्यासाठी शेतात थांबले होते. शनिवारी पहाटेच्या सुमारास १० ते १२ जणांच्या टोळीने त्यांना झोपेत असतानाच बेदम मारहाण करून दोरीने त्यांचे हातपाय बांधून ज्वारीच्या शेतात फेकून दिले. त्यानंतर शेतातील घराची मागील बाजुची भिंत तोडून आणलेल्या वाहनातून ३० क्विंटलपेक्षा अधिक कापूस लांबवला.
सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. पोलिसांना घडलेला प्रकार सांगितल्यानंतर धुळे तालुका पोलिसात याबाबत गुन्हा दाखल झाला असून पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत.
संबंधित बातम्या