गणेश विसर्जन मिरवणुकीच्या ट्रॅक्टरखाली येऊन तीन चिमुकल्यांचा मृत्यू; धुळे जिल्ह्यातील गावात उत्सवावर दु:खाचे सावट
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  गणेश विसर्जन मिरवणुकीच्या ट्रॅक्टरखाली येऊन तीन चिमुकल्यांचा मृत्यू; धुळे जिल्ह्यातील गावात उत्सवावर दु:खाचे सावट

गणेश विसर्जन मिरवणुकीच्या ट्रॅक्टरखाली येऊन तीन चिमुकल्यांचा मृत्यू; धुळे जिल्ह्यातील गावात उत्सवावर दु:खाचे सावट

Updated Sep 17, 2024 05:25 PM IST

Dhuleaccident : एका थांबलेल्या ट्रॅक्टरभोवती तीन चिमुकल्या मुली खेळत होत्या. तिघीही ट्रॅक्टरच्या मागील चाकाजवळ बसल्या होत्या. इतक्यात चालकाने ट्रक्टरवर चढून ट्रॅक्टर सुरू केला. यामध्ये तीन मुलींचा चिरडून मृत्यू झाला.

ट्रॅक्टरखाली सापडून तीन मुलींचा मृत्यू
ट्रॅक्टरखाली सापडून तीन मुलींचा मृत्यू

मुंबई, पुणे, कोल्हापूरसह संपूर्ण राज्यभरात आज आनंद उत्सवाची सांगता होत असून गणेश विसर्जन मिरवणुका मोठ्या उत्साहात व जल्लोषात सुरू आहेत. भाविक आपल्या लाडक्या गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप देत आहेत. शहरांसोबतच गावा गावात ट्रॅक्टर ट्रॉलीतून ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप दिला जात आहे. या आनंदाच्या वातावरणातच धुळे जिल्ह्यातून एक दु:खद घटना समोर आली आहे. धुळे शहराच्या जवळ असलेल्या चितोड गावात गणेश विसर्जनाची मिरवणूक निघण्यापूर्वीच एका ट्रॅक्टरखाली येऊन तीन चिमुकल्या मुलींचा मृत्यू झाला आहे. येथे उभ्या असलेल्या ट्रॅक्टरजवळ या मुली खेळत असताना हा भीषण अपघात घडला. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. 

या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यां मुली अनुक्रमे ४, ७ व १४ वर्षे वयाच्या आहेत. चितोड गावात गणेश विसर्जन मिरवणुकीची तयारी सुरू होती. सायंकाळी गणेश विसर्जन मिरवणूक निघाणार होती. मात्र त्यापूर्वीच एका ट्रॅक्टर खाली येऊन ३ चिमुकल्या मुलींचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे गणेश विसर्जन मिरवणुकांच्या उत्साहावर विरजण पडलं आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गुन्हा नोंदवला आहे. या अपघातामुळं गावात तणावाचे वातावरण असून स्मशान शांतता पसरली आहे. 

एका थांबलेल्या ट्रॅक्टरभोवती तीन चिमुकल्या मुली खेळत होत्या. तिघीही ट्रॅक्टरच्या मागील चाकाजवळ बसल्या होत्या. इतक्यात चालकाने ट्रक्टरवर चढून ट्रॅक्टर सुरू केला. मागे मुली खेळत असल्याची त्याला कल्पनाही नव्हती. ट्रॅक्टर या तीन चिमुकल्या मुलींच्या अंगावरुन गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी ट्रॅक्टरकडे धाव घेत मुलींना चाकाखालून बाहेर काढले मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. या घटनेत एक महिला देखील गंभीररित्या जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

हा अपघात नेमका कसा झाला, मुली खेळत असल्याचं चालकाच्या लक्षात कसं आलं नाही, याचा तपास पोलीस करत आहेत. पोलिसांनी अपघातग्रस्त ट्रॅक्टर ताब्यात घेतला आहे. तसेच, चालकाला ताब्यात घेऊन त्याची सखोल चौकशी केली जात आहे. दरम्यान, गणेश विसर्जनादिवशीच घडलेल्या या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर