Dhule Accident : नाल्यात कार कोसळून दोन मित्रांचा मृत्यू, ३१ डिसेंबर साजरा करून परतताना अपघात
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Dhule Accident : नाल्यात कार कोसळून दोन मित्रांचा मृत्यू, ३१ डिसेंबर साजरा करून परतताना अपघात

Dhule Accident : नाल्यात कार कोसळून दोन मित्रांचा मृत्यू, ३१ डिसेंबर साजरा करून परतताना अपघात

Jan 01, 2024 09:17 PM IST

Car Fall in Canal in dhule: रस्त्याकडेला असलेल्या ६० फूट खोल नाल्यात कार कोसळून दोन तरुणांचा मृत्यू झाला. हा अपघात शिरपूरजवळ घडला.

Dhule accident
Dhule accident

धुळे जिल्ह्यातील शिरपूर-चोपडा रस्त्यावर तांडे शिवारात एक कार ६० फूट खोल नाल्यात कोसळून झालेल्या अपघातात दोन मित्रांचा दुर्दैवी अंत झाला आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी ही घटना घडल्याने संपूर्ण शहरावर शोककळा पसरली आहे. या मार्गाच्या कडेला अनेक शेततळी आहेत. शेतजलयुक्त शिवार योजनेअंतर्गत काम झाले आहे. येथे ५० ते ६० फूट खोल नाला तयार करण्यात आला आहे. याच नाल्यात कार कोसळून अपघात झाला आणि यात दोन मित्रांचा मृत्यू झाला.

प्रवीण शिवाजीराव पाटील (वय ४२) आणि प्रशांत उर्फ पप्पू राजेंद्र भदाणे (वय ३४) असे मृत झालेल्या दोन मित्रांची नावे आहेत. नाल्यात कोसळल्यानंतर कारचा चक्काचूर झाला. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी दोन मित्रांचा अंत झाल्याने शिरपूर शहरावर शोककळा पसरली आहे. 

रविवारी रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. सकाळी रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांनी पाहिल्यानंतर ही घटना समोर आली. वाहनचालकांनी स्थानिकांच्या मदतीने नाल्यात उतरून पाहणी केली असता कारमध्ये दोन तरुणांचे मृतदेह आढळले. याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी मृतदेह नाल्यातून वर काढून पोस्ट मार्टमसाठी पाठवले. 

मुंबई- नाशिक महामार्गावर दोन भीषण अपघात; ३ ठार, ६ जखमी

मुंबई नाशिक महामार्गावर नवीन वर्षाच्या सुरतातीला दोन भीषण अपघात झाल्याचे वृत्त आहे. या अपघातात ३ जण ठार झाले. तर ६ जण जखमी झाले आहेत. एका अपघातात मर्सिडीज कारची आणि आयशरची जोरदार धडक झाली. तर दूसरा अपघात हा एका गाडीचा टायर पंक्चर झाल्यामुळे झाला. मुंबई-नाशिक महामार्गावरील इगतपुरी बायपास येथील बोरटेंभे येथे घडली. या ठिकाणी मर्सिडीज कार आणि आयशरची टेम्पोची जोरदार धडक झाली. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. दूसरा अपघात हा मुंबई-नाशिक महामार्गावरील पाचपाखाडी येथे सोमवारी सकाळी ४ च्या सुमारास घडली. त्यात पाच जण जखमी झाले.

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर