अजित पवार गटाचेमंत्री धर्मरावबाबा आत्राम (Dharmarao Baba Atram) यांची मुलगी भाग्यश्री हलगीकर लवकरच शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करून आगामी विधानसभा निवडणूक लढविणार असल्याची चर्चा आहे. मात्र जी मुलगी बापाची झाली नाही, ती तुमच्या पक्षाची कशी होईल, असा टोला आत्राम यांनी शरद पवार यांच्या पक्षाला लगावला होता. तसेच मुलगी दर माझ्या विरोधात गेली तर तिला नदीत फेकून देईन, अशीधमकीही आत्राम यांनी दिली होती. या धमकीला न घाबरता भाग्यश्री आत्राम हलगीकर या शरद पवार गटात प्रवेश करण्याची तारीख नक्की झाली आहे.
१२ सप्टेंबर रोजी भाग्यश्री आत्राम या शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. शरद पवारांची शिवस्वराज्य यात्रा १२ सप्टेंबरला अहेरीत येणार आहे. यावेळी भाग्यश्री शरद पवार गटात प्रवेश करतील. काही दिवसांपूर्वी त्यांनी शरद पवारांची भेट घेतल्याची चर्चा होती.
धर्मरावबाबा आत्राम यांनी जावई आणि मुलीला माझे कुटूंब सोडणार नसल्याची धमकी दिली होती. जी बापाची झाली नाही ती तुमची कशी होईल, असा सवाल करत शरद पवार गटातून आपलीच मुलगी आपल्याविरोधात उभी राहणार असल्याचे आत्राम यांनी स्पष्ट केले होते. यामुळे विधानसभेला वडील विरुद्ध मुलगी अशी लढाई रंगणार असल्यावर शिक्कामोर्तब झाले होते.
पक्ष फोडी करणारा पक्ष आता माझं घर फोडण्याचं काम करीत आहे,असं नाव न घेता अहेरीचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी शरद पवार गटावर टीका केली होती. आत्राम म्हणाले की,एक मुलगी गेली तरी एक मुलगी आणि एक मुलगा माझ्याकडे आहे. विरोधकांकडून माझ्या मुलीला हाताशी धरून घर फोडण्याचे काम सुरू आहे. पण जी मुलगी बापाची नाही झाली ती तुमच्या पक्षाची कशी होणार? माझ्याकडे दुधारी तलवार आहे, माझ्या वाटेला गेलात तर म्यानमधून तलवार बाहेर काढणार. एक मुलगी गेली तरी एक मुलगी आणि एक मुलगा माझ्याकडे आहे. जे माझ्या खुर्चीवर बसण्याच पाहतील त्यांना बाजूला करण्याचे काम मी करणार आहे. आत्राम घराणं हलगेकर (मुलीचे सासरकडील आडनाव) यांना नदीत टाकल्याशिवाय राहणार नाही, असं वादग्रस्त विधान आत्राम यांनी केलं आहे.
अजित पवार म्हणाले, विरोधकांकडून सध्या घरं फोडण्याचं काम सुरू आहे. ज्या बापाने जन्म दिला, जिल्हा परिषद अध्यक्ष बनवलं. तीच मुलगी आता बापाविरोधात गेली आहे. मात्र त्यांना एकच सांगणं आहे की, जेव्हा वस्ताद शिकवतो त्यावेळी तो सगळं शिकवत नाही. तो कायम एक डाव राखून ठेवतो. अजूनही चूक भूल करू नका, बापासोबत राहा, बापापेक्षा लेकीवर प्रेम कुणाचेच नसते.