राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची मुलगी भाग्यश्री शरद पवार गटाकडून वडिलांच्या विरोधातचविधानसभा निवडणूक लढविणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. यावर आत्राम यांनी वादग्रस्त प्रतिक्रिया दिलीआहे. पक्ष फोडी करणारा पक्ष आता माझं घर फोडण्याचं काम करीत आहे, असं नाव न घेताअजित पवार गटाचे नेते व अहेरीचे आमदार धर्मरावबाबा आत्राम (Dharmarao Baba Atram) यांनी शरद पवार गटावर टीका केली आहे. आत्राम म्हणाले की, एक मुलगी गेली तरी एक मुलगी आणि एक मुलगा माझ्याकडे आहे. जी मुलगी बापाची झाली नाही ती तुमची कशी होईल, असा सवालही धर्मरावबाबा आत्राम यांनी केला आहे.
राज्य सरकारमधील मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची कन्या भाग्यश्री हलगेकर ही शरद पवार गटाच्या संपर्कात असून आगामी विधानसभा निवडणूक लडणार असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे अहेरी मतदारसंघात वडील विरुद्ध मुलगी असा सामना रंगणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यावर धर्मरावबाबा आत्राम यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, विरोधकांकडून माझ्या मुलीला हाताशी धरून घर फोडण्याचे काम सुरू आहे. पण जी मुलगी बापाची नाही झाली ती तुमच्या पक्षाची कशी होणार? माझ्याकडे दुधारी तलवार आहे,माझ्या वाटेला गेलात तर म्यानमधून तलवार बाहेर काढणार. एक मुलगी गेली तरी एक मुलगी आणि एक मुलगा माझ्याकडे आहे. जे माझ्या खुर्चीवर बसण्याच पाहतील त्यांना बाजूला करण्याचे काम मी करणार आहे. आत्राम घराणं हलगेकर (मुलीचे सासरकडील आडनाव) यांना नदीत टाकल्याशिवाय राहणार नाही, असं वादग्रस्त विधान आत्राम यांनी केलं आहे.
गेल्या ५० वर्षापासून मी या भूमीचं रक्षण करत आलो आहे. गरीब आणि श्रीमंत अशा सर्व लोकांना समान न्याय दिला आहे. शेवटचा श्वास असेपर्यंत मी काम करत राहणार आहे. एक गेला तरी संपूर्ण कुटुंब माझ्यामागे आहे.
अहेरी येथील जनसंवाद यात्रेत बोलताना अजित पवार म्हणाले, विरोधकांकडून सध्या घरं फोडण्याचं काम सुरू आहे. ज्या बापाने जन्म दिला, जिल्हा परिषद अध्यक्ष बनवलं. तीच मुलगी आता बापाविरोधात गेली आहे. मात्र त्यांना एकच सांगणं आहे की, जेव्हा वस्ताद शिकवतो त्यावेळी तो सगळं शिकवत नाही. तो कायम एक डाव राखून ठेवतो. अजूनही चूक भूल करू नका, बापासोबत राहा, बापापेक्षा लेकीवर प्रेम कुणाचेच नसते. विरोधक घरामध्ये फूट पाडण्याचे काम करत आहेत, हे बरोबर नाही.