Dharashiv News: धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील येरमाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री धक्कादायक घटना घडली. शेतीच्या वादातून झालेल्या हिंसक हाणामारीत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर, दोन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, येरमाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बावी गावात हिंसक हाणामारी झाली. या हाणामारीत पाच जण गंभीर जखमी झाले. यातील तीन जणांचा उपचारपूर्वीच मृत्यू झाला. तर, दोन जणांवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. शेतीच्या वादातून हाणामारी झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. येरमाळा पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे.
हे दोन्ही कुटुंब एकमेकांचे नातेवाईक आहेत. या दोन्ही कुटुंबात गेल्या काही दिवसांपासून शेतात पाणी देण्यावरून वाद सुरू आहे. रविवारी मध्यरात्री पुन्हा त्यांच्यात वाद झाला. मात्र, हा विकोपाला गेल्याने दोन्ही कुटुंबात तुंबळ हाणामारी झाली, ज्यात तीन जणांना आपला जीव गमवावा लागला. मृतांमध्ये एका गटातील दोन आणि दुसऱ्या गटातील एका व्यक्तीचा समावेश आहे. येरमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश क्षिरसागर यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. पोलिसांनी संशयित आरोपींना ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू केला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
आप्पा काळे, सुनील काळे आणि वैजनाथ काळे, अशी या घटनेत मरण पावलेल्यांची नावे आहेत. सुनील काळे आणि परमेश्वर काळे हे बापलेक आहेत. या हाणामारीत तीन पुरुषांसह एक महिला गंभीर जखमी आहे. महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.