तुळजापूरमध्ये मस्साजोगची पुनरावृत्ती! सरपंचांच्या गाडीच्या काचा फोडून फेकले पेट्रोलचे फुगे; जिवंत जाळण्याचा प्रयत्न
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  तुळजापूरमध्ये मस्साजोगची पुनरावृत्ती! सरपंचांच्या गाडीच्या काचा फोडून फेकले पेट्रोलचे फुगे; जिवंत जाळण्याचा प्रयत्न

तुळजापूरमध्ये मस्साजोगची पुनरावृत्ती! सरपंचांच्या गाडीच्या काचा फोडून फेकले पेट्रोलचे फुगे; जिवंत जाळण्याचा प्रयत्न

Updated Dec 27, 2024 10:44 AM IST

Dharashiv Crime : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरंपच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येची घटना ताजी असतांना आता तुळजापूर जवळील मेसाई जवळगा गावच्या सरपंचावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. गुंडांनी त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

तुळजापूरमध्ये मस्साजोगची पुनरावृत्ती! सरपंचांच्या गाडीच्या काचा फोडून फेकले पेट्रोलचे फुगे; जीवंत जाळण्याचा प्रयत्न
तुळजापूरमध्ये मस्साजोगची पुनरावृत्ती! सरपंचांच्या गाडीच्या काचा फोडून फेकले पेट्रोलचे फुगे; जीवंत जाळण्याचा प्रयत्न

Dharashiv Crime : राज्यात सरपंचावरील हल्यांच्या घटनेत वाढ झाली आहे. बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येमुळे राज्यात राजकीय वातावरण तापले असून कायदा-सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह विरोधकांनी उपस्थित केले आहे. ही घटना ताजी असतांना आता आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना उघडकीस आली आहे. धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगा गावच्या सरपंचावर गुरुवारी रात्री हा हल्ला झाला. गुंडांनी त्यांच्या गाडीत पेट्रोलने भरलेले फुगे फेकून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. ही घटना बारुळ गावाजवळ मध्यरात्री घडली.

मिळालेल्या माहितीनुसार नामदेव निकम यांच्यावर हा हल्ला झाला आहे. निकम हे मेसाई जवळगा गावचे सरपंच असून गुरुवारी रात्री ते त्यांच्या घरी जात असतांना काही गुंडांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यांनी त्यांच्या गाडीच्या काचा फोडल्या. तसेच त्यांची गाडी पेटवण्याचा प्रयत्न देखील केला.

काय आहे घटना ?

नामदेव निकम हे त्यांच्या कारमधून गावी मेसाई जवळगा येथे जात होते. यावेळी काही अज्ञात गुंडांनी त्यांच्या गाडीवर आधी अंडी फेकली. यानंतर त्यांची गाडी अडवत त्यांच्या गाडीच्या काचा फोडल्या. यानंतर त्यांनी निकम यांच्या गाडीवर पेट्रोल ओतून गाडी पेटवण्याचा प्रयत्न केला. सरपंच नामदेव निकम हे बाहेर पडले यामुळे त्यांचा जीव थोडक्यात वाचला. या हल्ल्यात नामदेव निकम व त्यांचा एक सहकारी मित्र जखमी झाला आहे. 

सरपंच निकम यांनी दिलेल्या माहितीनुसार ते गुरुवारी रात्री तुळजापुरवरुन जवळगा येथे घरी परत जात होते. त्यावेळी त्यांच्या गाडीच्या दोन्ही बाजुंनी दोन बाइक आल्या. यावेळी दोन्ही बाईकस्वार मोठ्याने हॉर्न वाजवत असल्याने त्यांना पुढे जायचे असल्याचे निकम यांना वाटले. यामुळे त्यांनी त्यांना पुढे जाऊ दिले. मात्र, दुचाकीवरील गुंडांनी त्यांच्या गाडीवर अंडी फेकली व त्यांची गाडी अडवली. यावेळी एकाने त्यांच्या गाडीची काच फोडली व गाडीत पेट्रोलने भरलेले फुगे टाकले. यानंतर दुसऱ्या बाजूच्या दरवाजाची देखील काच त्यांनी फोडली. यामुळे त्यांनी गाडी सुरू करत वेगाने गाडी पुढे नेली. मात्र, काचावर अंडी फोडल्याने त्यांना पुढचे दिसत नव्हते. त्यामुळे त्यांच्या गाडीचा वेग हा कमी झाला. यावेळी आरोपींनी त्यांची गाडी पेटवण्याचा प्रयत्न केला. दारमान, हा हल्ला पवनचक्कीच्या वादातून झाला असल्याची शंका निकम यांनी व्यक्त केली आहे.

गुन्हा दाखल

या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहे. त्यांनी पंचनामा केला असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली आहे. हा हल्ला पवनचक्कीच्या वादातून हल्ला झाला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर