Pune Dhankawadi crime : पुण्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सोसायटीतील लिफ्ट वरुन वाद झाल्याने एका मुलीला आणि तिच्या आईला सतत त्रास आणि धमक्या दिल्या जात असल्याने एका मुलीने शिक्षण सोडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तब्बल वर्षभर हा त्रास सहन केल्यावर पीडित मुलीने या प्रकरणी थेट राष्ट्रीय महिला आयोगाला पत्र लिहून या बाबत दाद मागितली. यानंतर सहकार नगर पोलिसांना जाग आली असून त्यांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहे.
या घटनेचे वृत्त असे की, पीडित मुलगी ही तिच्या आई सोबत धनकवडी येथे एका सोसीटीत राहते. सोसायटीत असणाऱ्या लिफ्ट वरुन याच इमारतीत पहिल्या मजल्यावर राहत असलेल्या व्यक्तिचे आणि मुलीच्या आईचा मोठा वाद झाला. ही घटना जानेवारी २०२३ मध्ये घडली होती. यानंतर आरोपीने पीडित मुलीच्या आईला मारहाण केली. यामुळे पीडितेने आणि तिच्या आईने सहकारनगर पोलिस ठाण्यात जाऊन या प्रकरणी तक्रार दिली. मात्र, त्याच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. दरम्यान, आरोपी याने पीडित मुलीला त्रास देण्यास सुरुवात केली. पीडित मुलगी ही घराबाहेर पडतांना तिला तो तिला छळत होता.
मुलीची आई ही कामानिमित्त बाहेर असायची याचा फायदा देखील आरोपी घेत होता. दरम्यान, पीडित मुलगी ही अपार्टमेंटमधून ये-जा करताना आरोपी तिला पाहून अश्लील इशारे आणि हावभाव करत होता. ती जिन्याने खाली येत असतांना तीची वाट अडवणे, हात पकडणे, फोन नंबर मागणे, पाठलाग देखील करत होता. या प्रकारांमुळे पीडित मुलगी घाबरली होती. या बाबत त्याला जाब विचारल्यास 'तुझ्या आईला आणि तुला बघून घेईन. माझे कोणी काही वाकडे करू शकत नाही. माझ्यावर गुन्हा नोंदवून माझे काही झाले नाही,' अशी धमकी देखील आरोपीने मुलीला दिली.
या सर्व प्रकारामुळे पीडित मुलगी ही कंटाळली होती. भीती पोटी तिने विद्यालयात प्रवेश देखील घेतला नव्हता. तसेच घराबाहेर पडणे देखील तिने बंद केले होते. आपल्या आईच्या काळजी पोटी, मुलीने हा त्रास तब्बल वर्षभर सहन केला. यामुळे तिच्या तब्येतीवर देखील परिणाम झाला. तिला डोकेदुखीचा त्रास सुरू झाला. यामुळे तिला उपचार देखील घेण्याची वेळ आली. यानंतर तिने हा प्रकार तिच्या आईला सांगितला.
दरम्यान, आरोपीवर कोणतही कारवाई होत नसल्याने पीडित मुलीने थेट राष्ट्रीय महिला आयोगाला या बाबत पत्र लिहीत तिला होणाऱ्या त्रासाबद्दल माहिती दिली. तिच्या पत्राची दखल घेत आयोगाने या प्रकरणी कारवाई करण्याचे आदेश दिले. यानंतर सहकार नगर पोलिसांनी आरोपीला अटक केली. अशी माहिती सहकार नगर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक युवराज पोटरे यांनी दिली.
संबंधित बातम्या