मराठा आंदोलनानंतर आता राज्यात धनगरआंदोलनाने वातावरण तापलं आहे. धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण द्यावे यासह अन्य प्रमुख मागण्यांसाठी समस्त धनगर समाजाच्या वतीने मार्चा काढण्यातआला होता. या मोर्चाला जालन्यात हिंसक वळण लागले आहे. आरक्षणासाठी हिंसक झालेल्या धनगर समाजातील आंदोलकांनी जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयाचे गेट तोडून धनगर समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्ला केला तसेच बाहेर थांबलेल्या जिल्हाधिकाऱ्यांची गाडीही आंदोलनकर्त्यांनी फोडल्याची माहिती समोर आली आहे.
अनुसूचित जमाती आरक्षणाच्या अंमलबजावणीसह अन्यमागण्यांसाठी समस्त धनगर समाजाच्या वतीने आज (मंगळवार) सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.यामध्ये जिल्ह्यातील धनगर समाज बांधव सामील झाले होते. शहरातील गांधी चमन येथून मोर्चा सुरू होऊन शनि मंदिर, उड्डाणपुल, नुतन वसाहत,अंबड चौफुलीमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.
जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आल्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले आणि नेत्यांचे भाषण झाले. भाषणानंतर काही लोकांनी जिल्हाधिकारी यांनी खाली येऊन निवेदन घेण्याची मागणी केली. पण, जिल्हाधिकारी खाली न आल्याने काही तरुण आक्रमक झाले व त्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात घुसून तोडफोड करायला सुरवात केली. पाहता पाहता मोठा जमाव जिल्हाधिकारी कार्यालयात घुसल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची गाडीही फोडली आहे.
धनगर समाजाच्या आजच्या मोर्चाला शांततेच्या मार्गानेआंदोलन करणे तसेच कायदा सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होणार नाही या अटीवर प्रशासनाने परवानगी दिली होती. मात्र निवेदन घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी विलंब लावल्याने आंदोलन हिंसक बनले.