Dhananjay Munde Vr Karuna Sharma Munde : मंत्री धनंजय मुंडे यांना घरगुती हिंसाचार प्रकरणात कौटुंबिक न्यायालयाने दोषी ठरवले आहे. वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने करुणा शर्मा मुंडे या त्यांच्या पहिल्या पत्नी असल्याचे मान्य केलंन असून त्यांना २ लाख रुपयांची पोटगी देण्याचे आदेश देण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते, राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांना अडचणी आता आणखी वाढल्या आहेत. त्यांना कौटुंबिक न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. वांद्रे कोर्टाने करुणा शर्मा या धनंजय मुंडेंच्या पत्नी असल्याचा निर्वाळा दिला आहे. या सोबतच करुणा शर्मा यांना दरमहा २ लाख रूपये पोटगी देण्याचे आदेशही कोर्टानं दिले आहेत. कौटुंबीक हिंसाचार प्रकरणात धनंजय मुंडे यांच्याविरोधात केलेले आरोप न्यायालयाने मान्य केले असून त्यांना घरगुती हिंसाचार प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरवलं आहे.
या प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विट केलं असून "करुणा मुंडे या फॅमिली कोर्टात ४ फेब्रुवारी रोजी केस जिंकल्या. त्याबद्दल एक स्त्री म्हणून त्यांचे अभिनंदन. मी वैयक्तिक विषयावर बोलत नाही. ही वैयक्तिक टीका नाही ह्याची नोंद घ्यावी करुणा, ह्या धनजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आहेत, त्यांना मारहाण झाली आहे आणि देखभाल खर्च देण्यात यावा आणि कुठल्याही प्रकारची दुखापत करण्यात येऊ नये असे निर्देश आणि १,२५,००० रुपयाचा मासिक खर्च देण्यात यावा असे निर्देश कोर्टाने दिले आहेत, असे दमानिया यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
करुणा शर्मा यांनी या प्रकरणी प्रतिक्रीया दिली आहे. कोर्टाच्या निकालावर त्यांनी समाधान व्यक्त केलं आहे. मात्र, पोटगीबाबत आपण दाद मागणार असल्याचंन त्या म्हणाल्या. करुणा मुंडे म्हणाल्या, माझे पती धनंजय मुंडे यांचे वार्षिक उत्पन्न ६५ कोटी रुपये आहे. मात्र, त्या तुलनेत मला मिळणारी पोटगी ही कमी आहे. त्यामुळे मला पोटगी वाढवून देण्याची मागणी करणार आहे. मला दरमहा १५ लाख रुपयांच्या पोटगी मिळावी. मात्र, कोर्टाने फक्त २ लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश दिले असल्याचे करुणा मुंडे म्हणाल्या.
गेल्या काही महिन्यांपासून धनंजय मुंडे हे चांगलेच वादात अडकले आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी वाल्मीक कराडशी असलेल्या संबंधावरून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. तर, काही दिवसांपूर्वीच कृषी मंत्री असताना त्यांनी घोटाळा केल्याचा आरोप देखील होत आहे.
संबंधित बातम्या