Dhananjay Munde: लगेच राजीनामा देईन पण..; धनंजय मुंडेंनी निर्णयाचा चेंडू ढकलला फडणवीस-अजित पवारांच्या कोर्टात
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Dhananjay Munde: लगेच राजीनामा देईन पण..; धनंजय मुंडेंनी निर्णयाचा चेंडू ढकलला फडणवीस-अजित पवारांच्या कोर्टात

Dhananjay Munde: लगेच राजीनामा देईन पण..; धनंजय मुंडेंनी निर्णयाचा चेंडू ढकलला फडणवीस-अजित पवारांच्या कोर्टात

Jan 29, 2025 06:00 PM IST

Dhananjay Munde : मुंडे यांनी म्हटले की, माझी नैतिकता माझ्या लोकांबाबत प्रामाणिक आहे. मी जे बोलतो,ते अतिशय प्रामाणिकपणे बोलतो. मी नैतिकदृष्ट्या दोषी नाही,असे मला वाटते.

धनंजय मुंडेंनी स्पष्ट केली राजीनाम्याची भूमिका
धनंजय मुंडेंनी स्पष्ट केली राजीनाम्याची भूमिका

Santosh Deshmukh case : दिल्ली दौऱ्यावर असलेले धनंजय मुंडे यांनी राजीनाम्याच्या प्रश्नावर उत्तर दिले आहे, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाटत असेल की, मी राजीनामा द्यावा तर मी राजीनामा देण्यास तयार आहे. मी दोषी आहे की नाही, हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीच सांगू शकतील. ५१ दिवसांपासून मला लक्ष्य केले जात आहे.

धनंजय मुंडे दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांनी अन्न व नागरी पुरवठा खात्याशी संबंधित प्रश्नासंदर्भात केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची भेट घेतली. भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.सरपंच हत्या प्रकरणात नैतिकतेच्या मुद्द्यावर स्वतःहून राजीनामा देणार का? या प्रश्नावर मुंडे यांनी म्हटले की, माझी नैतिकता माझ्या लोकांबाबत प्रामाणिक आहे. मी जे बोलतो, ते अतिशय प्रामाणिकपणे बोलतो. मी नैतिकदृष्ट्या दोषी नाही,असे मला वाटते.

अशा तऱ्हेने दिल्ली दौऱ्यावरअसलेल्या धनंजय मुंडेंनी मंत्रि‍पदाच्या राजीनाम्याच्या निर्णयाचा चेंडू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कोर्टात ढकलला आहे.

धनंजय मुंडे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना जर मी दोषी वाटत असेल, तर त्यांनी राजीनामा मागावा; मी लगेच राजीनामा देणार. पण, फक्त हा विषय काढून राजीनामा होत असेल, याबाबतीत मी दोषी आहे की नाही; हे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सांगू शकतील. त्या गोष्टी स्पष्ट झाल्या पाहिजेत.

 

संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होत आहेत. हत्येप्रकरणात धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराडला अटक झाल्यानंतर धनंजय मुंडे अडचणीत सापडले असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. यावर आपली भूमिका स्पष्ट करताना मुंडे यांनी संतोष देशमुख प्रकरणातील आरोपींना फासावर चढवा अशी मागणीही केली.

Whats_app_banner

संबंधित बातम्या